Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये | Shri Krishna Katha Marathi

आम्हाला माहित आहे तुम्ही सगड्यांना श्री कृष्ण च्या गोष्टी (Krishna Stories in Marathi) खूप अवाढतात. खाली तुम्हा सगड्यां साठी काही  श्री कृष्ण च्या गोष्टी लिहिल्या आहे. 

Krishna Stories in Marathi

तुम्हाला ह्या गोष्टी वाचण्यात खूपच आनंद येईल आणि या गोष्टी तुम्हाला नक्कीच आवडेल. लहान मुलांच्या मराठी गोष्टी.


1. दुष्ट कंस

krishna marathi stories

"पाच हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. भारतात तेव्हा लोकवस्ती खूप कमी असून जिकडेतिकडे मोठमोठी जंगलं होती.

जिथे लोकवस्ती असे तिथे लहान राज्य असे. मथुरा हे तेथील एक राज्य होते.

यमुना नदीच्या काठी ‘मथुरा’ वसलं आहे. मथुरेच्या राजाचे नांव उग्रसेन असे होते. उग्रसेन राजा नीतीने राज्य करून प्रजेचं कल्याण साधत असे. उग्रसेनाला एक मुलगा होता. त्याचे नांव कंस होते.

कंस फार पराक्रमी होता. परंतु तो खूप दुष्ट स्वभावाचा होता. त्याने स्वतःच्या वडीलांना प्रत्यक्ष उग्रसेनाला कैदेत टाकले व तो स्वतः मथुरेचा राजा झाला. सगळी प्रजा त्याच्या दुष्टपणामुळे त्रासली होती.

कंसाला एक चुलत बहीण होती, तिचे नांव देवकी होते. तिचा विवाह एका वसुदेव नावाच्या गोप सरदाराबरोबर झाला होता. वसुदेव अतिशय सुस्वभावी व नीतीने वागणारा होता.

कंसाला कोणीतरी सांगितले की, देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून त्याचा मृत्यू होईल; तेव्हा वेळीच उपाय करून ठेव. ते ऐकताच कंसाला खूप राग आला व त्याने ताबोडतोब वसुदेव-देवकी यांना पकडून मथुरेतील एका वाडयात कैद करून ठेवले. कंसाने ठरविले की, देवकीची सगळीच मुलं मारून टाकली म्हणजे आपल्याला शत्रू राहणार नाही.

कंसाने लगेचच देवकीला आज्ञा केली, तुला होणारं प्रत्येक मूल जन्मल्याबरोबर माझ्या ताब्यात दे. जेथे वसुदेव व देवकी यांना ठेवले होते तेथे त्याने पहारा बसविला होता.

वसुदेव हा गरीब स्वभावाचा असून त्याला बिचाऱ्याला उगीचच कैदेत रहावे लागले म्हणून सर्व लोकांना फार वाईट वाटले, पण दुष्ट कंसापुढे कोणाचे काहीही चालत नव्हते.

Read: Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

2. कृष्णाचा जन्म

krishna birth story in marathi

"देवकीला काही दिवसांनंतर एक मूलं झालं. कंसाला लगेच पहारेकऱ्यांकडून ही बातमी समजली. कंस ताबोडतोब वाडयात आला व त्याने देवकीच्या रडण्याकडे लक्ष न देता तिच्या हातातून ते मूल ओढून घेतले व वाडयाबाहेर जाऊन एका शिळेवर आपटले.

देवकीची पुढची सहा मुलंही अशा प्रकारे कंसाने मारून टाकली.

वसुदेव-देवकी यांना आपली मुलं मारल्याबद्दल अतिशय दुःख होत असे पण त्यांचे कंसापुढे काही चालत नव्हते. देवकीला होणारा आठवा मुलगा आपला शत्रू आहे हे कंसाला कळलं होतं, म्हणून त्याने आठव्या मुलाच्या वेळेस वाडयावर अधिक कडक पहारा ठेवण्याची व्यवस्था केली.

देवकी आठव्या मुलाच्या वेळेस रात्री बारा वाजता प्रसूत झाली.

तो दिवस श्रावणातील वद्य सप्तमीचा दिवस होता. जन्माला आलेला हा आठवा मुलगा अतिशय तेजस्वी होता. त्या लहान व गोड बालकाला पाहून त्याला आपण कंसापासून वाचवावे असे वसुदेव-देवकी दोघांनाही वाटले. तो विचार दोघांच्या मनात येताक्षणी वाडयावरच्या पहारेकऱ्यांना अचानक झोप लागली व आपोआपच वाडयाचे दरवाजे उघडले.

ते बघताच वसुदेव लगेच त्या मुलाला खांद्यावर घेऊन निघाला.

वसुदेवाचा जिवलग मित्र नंद हा यमुनेच्या पलीकडे गोकुळात रहात होता. नंद हा एक गोप सरदार होता. वसुदेवाने त्याच्याकडे जायचे ठरविले.

श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे धो धो पाऊस पडत होता. त्यामुळे यमुना नदीला पूर आला होता. पूर फारच जोराचा होता; परंतु तरी देखील वसुदेव न घाबरता तसाच नदीत शिरला.

वसुदेव नदीतून जात असताना अचानक त्याने खांद्यावर घेतलेल्या बालकाच्या पायाचा स्पर्श पाण्याला होताच चमत्कार झाला. आणि यमुनेचं पाणी एकदम दुभंगलं आणि वसुदेव सुरक्षितपणे नदीपार झाला.

तेव्हा गोकुळात नंदाची पत्नी यशोदा देखील प्रसतू झाली होती. तिला मुलगी झाली होती.

जेव्हा वसुदेव नंदच्या घरी गेला तेव्हा सगळीकडे सामसूम होती.

वसुदेवाने देवकीचा मुलगा यशोदेच्या कुशीत ठेवला व नुकतीच जन्मलेली यशोदेची मुलगी घेऊन तो मथुरेला परतला.

हे सगळं होईपर्यंत मथुरेतील वाडयातील कोणीही जागं झालं नाही.

वसुदेव पहाटेच्या वेळी परत आला तेव्हा पहाऱ्यावरची मंडळी जागी झाली.

त्यांनी देवकी प्रसूत झाल्याचं पाहून लगेचच कंसाला ती बातमी कळवली. ती बातमी ऐकून कंस धावतच वाडयात आला. त्याने देवकीच्या पुढयात असलेलं मूल पाय धरून उचललं.

ते बघून देवकी कंसाला गयावया करत म्हणाली, “दादा, ही मुलगी आहे, हिला मारू नकोस रे!”

तिचे रडणे बघून देखील कंसाला तिची दया आली नाही, व त्याने तिचे न ऐकताच त्या मुलीला बाहेर आणून तो शिळेवर आपटणार तोच ती मुलगी त्याच्या हातातून निसटली व आकाशात जाता जाता कंसाला म्हणाली, “दुष्टा, तुझा शत्रू जन्माला आला आहे व तो सुखानं वाढतो आहे. आता त्याच्या हातून तुझा नाश अटळ आहे.

Read: Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत 

3. गोकुळेतील कृष्णच्या बाललीला

krishna child story in marathi

गोकुळेमध्ये यशोदेला मुलगा झाल्याचे ऐकून सर्वांनाच खूप आनंद झाला. नंद व यशोदेचा आनंद तर गगनात मावेना. त्यांच्या त्या गोड बालकाला पहाण्यासाठी सारे जण त्यांच्या घरी येऊ लागले. या बालकाने साऱ्यांना जणू मोहवून टाकलं. त्याच्या जन्माचा गोकुळात खूप मोठा उत्सव साजरा केला व त्याचे बारसे करून त्याचे नाव ‘कृष्ण’ असं ठेवण्यात आलं.

कृष्ण हा अतिशय सुंदर व तेजस्वी होता. त्यामुळे तो सर्वांनाच फार आवडत असे.

जसजसा कृष्ण मोठा होऊ लागला तसतसा त्याच्या बाललीला पाहून तो सगळयांना अधिकच आवडू लागला.

गोकुळामध्ये दहया दूधाची व लोण्याची लयलूट होती. आणि बाल गोपालकृष्णाला दूध, दही व लोणी फार आवडत असे. कोणीही त्याला रागवत नसे. कारण तो सगळयांचा लाडका होता.

कृष्ण रोज त्याचे संवंगडी जमवून कोणत्याही गोपीच्या घरात जाऊन दही, दूध, लोणी असे मिळेल ते खात असे व पसार होत. असा त्याचा जणू तो नियमच होऊन गेला होता.

कृष्णाने एकदा त्याच्या सगळया बालमित्रांना जमवून घरचं दही व दूध संपवलं.

यशोदेला कृष्णाचा खूप राग आला. तेव्हा सर्व गवळणी यशोदेकडे कृष्णाची तक्रार घेऊन आल्या.

त्या यशोदेला म्हणाल्या, “यशोदे, तुझा मुलगा आमचं सगळं दही-दूध खाऊन टाकतो. त्याला तू मारू नको पण रागाव.”

यशोदेला कृष्णाचा आधीच राग आला होता. तिने लगेच कृष्णाला हाक मारली व त्याला शिक्षा करण्यासाठी सगळया गोपींच्या समोर कृष्णाला उखळाशी बांधून ठेवलं.

नंतर सर्वजणी त्यांच्या कामाला निघून गेल्या.

कृष्णाने थोडासा जोर करून उखळ खाली पाडलं आणि तो अंगणात गेला. अंगणात दोन मोठे जुनाट वृक्ष जवळजवळ होते. त्या दोन वृक्षांमधून तो मुद्दामच जाऊ लागला, तेव्हा ते उखळ वृक्षांमध्ये अडकलं.

कृष्णाने परत जोर करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले व त्याचा खूप मोठा आवाज झाला. तो आवाज ऐकून गोकुळातील सर्व माणसं तिथे धावत आली.

ते सर्व बघून यशोदा खूप घाबरून गेली व तिने धावत जाऊन कृष्णाला सोडलं व आपल्या पोटाशी धरल व म्हणाली, “कृष्णा, मी आता तुला कधीही शिक्षा करणार नाही.”

वृक्ष मोठे असून त्यांच्या पडण्याने कृष्णाला काहीच इजा झाली नाही, हे पाहून सगळयांना समाधान वाटलं.

सर्व गोपी यशोदेला म्हणाल्या, “आता आम्ही तुला कृष्णाबद्दल काही तक्रारी सांगणार नाही.

Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

4. कृष्णाचे सवंगडी

krishna kid story in marathi

"कृष्ण व त्याचा भाऊ बलराम हे दोघं सहा-सात वर्षांचे झाले. तेव्हा त्यांना चांगले वस्त्रं नेसवून, त्यांच्या डोक्यावर मोरपिसांचा मुकुट घालून आणि हातात काठी व पावा देऊन गाई आणि वासरं चारावयास वनात पाठवलं जात.

ते दोघं भाऊ दररोज सकाळी न्याहारी करून रानात गुरं राखायला जाऊ लागले.

त्यांच्याबरोबर इतरही आणखी बरीच गवळयांची मुलं जात असत.

तेथे गेल्यावर रानामध्ये ही मुलं अनेक वेगवेगळया प्रकारचे खेळ खेळून सगळा दिवस मजेत घालवत असत.

कृष्ण हा त्यांचा सर्वांचाच खूप आवडता होता. त्यामुळे सगळया गोपाळांना आपण त्याच्याजवळ नेहमी असावं असे वाटत असे.

कधी सवंगडयांबरोबर खूप धावावं. तर कधी पक्षांचे आवाज काढावे. कधी झाडांवरची फळं काढावी, एकमेकांना वाकुल्या दाखवाव्या असं रोज चालायचं.

कृष्ण दुपारच्या वेळेस यमुनेच्या काठी असलेल्या एखाद्या वृक्षाखाली उभा राहून त्याचा पावा वाजवत असे.

तो आवाज ऐकून त्याचे सर्व सवंगडी व गाईवासरं त्याच्याभोवती जमत असे.

गाईवासरं पाणी पिऊन रवंथ करू लागली की, कृष्ण व त्याचे सवंगडी एकत्र बसून मजेत जेवण करत. कृष्णाच्या हातून खाल्लेला घास सगळयांनाच आवडत असे.

कृष्णांच्या या सवंगडयांध्ये त्याचा सर्वात आवडता सवंगडी होता पेंद्या.

तसेच पेंद्याचे देखील कृष्णावर फार प्रेम होते. जर त्याला कृष्ण कुठे दिसला नाही तर तो कावराबावरा होत असे.

संध्याकाळ झाली की सर्वजण परत आपल्या घरी जात असे. आणि पुन्हा केव्हा एकदा सकाळ होते व आपण कृष्णाबरोबर वनात जातो अस त्यांना होत असे.

5. कालियाचा पराभव

krishna and kaliya story in marathi

"कृष्ण व बलराम थोडे मोठे झाले होते. ते दररोज गाईवासरांना घेऊन सवंगडयांबरोबर रानात जात. तेथे गेल्यावर कुस्त्या खेळाव्या, गळयात फुलांचे हार व डोक्यावर मोरपिसांचे मुकुट घालून मुरलीच्या नादात नाचावे व मौज करावी, हा जणू त्यांचा नित्यक्रमच होता.

गोपांच्या या वस्तीपासून एका कोसाच्या अंतरावर यमुना नदीत एक खोल पाण्याचा डोह होता. या डोहामध्ये एक कालिया नावाचा भयंकर काळा सर्प रहात असे. त्या सर्पाला सात फणा होत्या. त्याच्या विषामुळे त्या डोहातील पाणी अत्यंत विषारी बनलं होतं. कालियाच्या भीतीने त्या डोहाच्या जवळ पशू-पक्षी, किंवा इतर माणसं फिरकत नसे. त्यामुळे त्या भागात भयंकर रान माजल होत.

कृष्णाने ठरविले की, या सर्पाचा आपण नाश करायचा व तेथील पाणी शुध्द करायचं आणि सर्वांची भीती नाहीशी करायची.

एके दिवशी कृष्ण त्याच्या सवंगडयांची नजर चुकवून त्या डोहाजवळ गेला व तेथे असलेल्या एका कदंबाच्या झाडावर चढून त्याने आपले दंड थोपटले, जोरात एक आरोळी ठोकून डोहात उडी घेतली. डोहातील पाणी त्याबरोबर चारी बाजूस उसळलं.

पाणी उसळलेलं बघून कालिया संतापला व पाण्यावर आला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो आपल्या सातही फणांतून सगळीकडे विष पसरीत होता.

कालियाने कृष्णाला घट्ट विळखा घातला व त्याला चावण्यासाठी प्रयत्न करू लागला तेव्हा कृष्णाने त्याची मान घट्ट आवळून धरली.

इकडे कृष्ण कुठेही दिसत नाही हे बघून त्याचे सवंगडी तेथे आले. व समोर दिसणारे भयंकर दृश्य पाहून ते घाबरून गेले, आणि अहो, कोणीतरी आमच्या कृष्णाला वाचवा, असे ओरडत ते गोकुळाकडे धावले.

त्यांचे ते ओरडणे ऐकून सगळे गोकुळ यमुनेच्या त्या डोहावर जमा झालं. तो प्रकार पाहून सर्वजण खूप घाबरून गेले होते. यशोदा तर ते बघून जोरात आक्रोश करू लागली.

कृष्णाने मातेचा तो शोक पाहून कालियाचं तोंड अधिकच जोरानं दाबलं. तेव्हा कालिया घाबरला आणि त्याचे कृष्णाभोवती घातलेले विळखे सैल झाले. मग कृष्णाने त्याच्या मस्तकावर चढून नाचायला सुरूवात केली.

अखेरीस कालिया कृष्णाला शरण आला. तो यमुनेच्या डोहातून निघून गेला. कृष्ण नदीच्या काठावर आल्यावर यशोदेने त्याला घट्ट मिठी मारली व प्रेमाने जवळ घेतले.

ते बघून सर्वांनाच खूप आनंद झाला. नंतर सगळेजण गाणी म्हणत उत्साहाने कृष्णासह गोकुळात परत आले.

6. कृष्णाची बैलाशी झुंज

krishna fight story in marathi

सर्वच गोपाळकृष्णांना दूध, दही नि लोणी खूप आवडत असे. ते खाऊन सर्वजण धष्टपुष्ट झाले होते. त्यांच्यात कृष्ण-बलराम हे फार ताकदवान होते. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ होता. त्यात ते दोघेही अगदी पटाईत होते.

गोपाळांचा दुसरा आवडता खेळ म्हणजे चांदण्या रात्री रासक्रीडा होय. ते कधी बासरी वाजवी तर कधी गोपगोपींसह रास खेळत.

एकदा रात्रीच्या वेळी गोपगोपी कृष्णासह आनंदाने टिपऱ्यांचा खेळ खेळत होते. तेव्हा अचानक एक काळा कुळकुळीत भयंकर असा बैल गोकुळात शिरला.

बैलाचे डोळे एखादया निखाऱ्यासारखे चमकत होते आणि शिंग तलवारीच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण होती. त्याने धडक दिली की मोठेमोठे वृक्षही उन्मळून पडत होते. त्याच्या भीतीनं सगळे गोप गांगरून सैरावैरा पळू लागले.

तेव्हा कृष्णाने पुढे येऊन त्या मस्तवाल बैलाची दोन्ही शिंग दोन्ही हातांनी धरून त्याला जोराने मागे रेटलं. त्याने त्याची मान पिरगळून त्याला खाली पाडलं. नंतर त्याच एक शिंग उपटून त्या शिंगान एक जोराचा फटका त्याच्या तोंडावर मारला. त्याबरोबर तो बैल तडफडून मरून पडला.

कृष्णाने केलेला हा पराक्रम पाहून सगळया गोपगोपींना नवल वाटलं.

कृष्णाला सगळ गोकुळ देवाप्रमाण मानू लागले.

7. कृष्ण व गोवर्धन

krishna and goverdhan story in marathi

"पावसाळा संपला आणि शरदऋतू सुरू झाला होता. दरवर्षीप्रमाणे गोपगोपींनी इंद्राचा उत्सव करण्याची तयारी सुरू केली.

कृष्णाने विचारले, “तुम्ही इंद्राचा हा उत्सव कशासाठी करता?” तेव्हा एक म्हातारा म्हणाला, “कृष्णा, इंद्रदेव हा पाऊस पाडतो. त्यामुळे पिके येतात व भरपूर हिरवं गवत उगवते. ते गवत गुर खातात व त्यावर गुरं पोसतात आणि दूध देतात. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल. अन्नपाण्याशिवाय सर्व लोकांचे हाल होतील. त्यासाठी वेळेवर पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवांना आपण संतुष्ट केले पाहिजे; आणि त्यासाठी हा उत्सव आहे.”

कुष्णाला हि गोष्ट पटली नाही. तो म्हणाला, “हे बरोबर नाही, कारण आपल सगळं जीवन डोंगर-दऱ्या आणि गुर यावरच अवलंबून आहे. पलीकडचा जो गोवर्धन पर्वत आहे, तो किती चित्रविचित्र रंगाच्या पक्षांनी शोभून दिसत आहे. त्यावरचे मोठे वृक्ष फळांफुलांनी बहरून गेले आहेत. हिरवीगार कुरणं किती सुंदर दिसत आहे. म्हणून आपण सर्वांनी हया गोवर्धन पर्वताचा आणि गाईवासरांचा उत्सव करू या.”

कृष्णाचे हे बोलणे सर्वांना पटले.

त्यांनी सर्वांनी गाईवासरांना वेगवेगळया फुलांनी सजवून त्यांच्यासह सर्वांनी गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली आणि मोठा उत्सव केला.

सगळयांना आनंद झाला. परंतु इंद्राला हे काहीही आवडले नाही. आपला उत्सव या गोपांनी केला नाही म्हणून त्याला राग आला व त्याने जोराचा पाऊस पाडण्यास सुरूवात केली.

हे बघून सगळे गोप घाबरले. कृष्णाने सर्वांना धीर दिला. त्याने गोवर्धन पर्वत उचलला व आपल्या करंगळीवर तोलून धरला. सतत सात दिवस पाऊस जोरदार पडला, परंतु गोपांना गोवर्धनच्या छपराखाली असल्यामुळे त्याचा काही त्रास झाला नाही.

इंद्र शेवटी कंटाळला आणि पाऊस थांबला. सगळेजण कृष्णासह परत गोकुळात आले.

तेव्हापासून कृष्णाला सर्वजण गोवर्धन-गिरिधारी असं म्हणू लागले. त्या सगळयांची कृष्णावरची भक्ती अधिकच वाढली.

8. कंसाची घाबरगुंडी

krishna and kand story in marathi

कृष्ण-बलरामाच्या पराक्रमाच्या गोष्टी कंसाला कळत होत्या. त्यांचे पराक्रम ऐकून तो मनातून अतिशय घाबरला होता.

तेव्हाच कंसाला कळले की, कृष्ण हा नंदाचा मुलगा नसून वसुदेवाचाच आठवा मुलगा आहे. हे कळल्यावर कंस अधिकच भयभीत झाला, म्हणून त्याने वसुदेवाला पुन्हा कैदेत टाकलं.

काहीही करून कृष्णाचा नाश कसा करावा याचा तो विचार करू लागला.

शेवटी त्याने ठरविले की, कृष्ण व बलराम यांना कुस्त्या पाहण्यासाठी बोलवावं आणि त्यांचा आपल्या पहिलवानांकडून नाश करावा.

कंसाने अक्रुर नावाच्या सरदाराला बोलावले व म्हणाला, “अक्रुरा, तू गोकुळात जा व कृष्णाला व बलरामाला येथे घेऊन ये. ते दोघेही मल्लविद्येत पटाईत आहेत. आपल्याकडेही मोठे मल्ल आहेत. आपण कुस्त्यांचा मोठा उत्सव करू.

अक्रुर हा कृष्णभक्त होता. कंसाच्या आज्ञेप्रमाणे गोकुळात जाण्याच ठरवलं.

कंसाला वाटत होत की, कृष्ण हा आपला शत्रू आहे. त्याला मथुरेत येण्याआधीच संपवावं. तेव्हा अक्रुर गोकुळात जाण्यापूर्वीच कृष्णाचा नाश करण्याचे त्याने ठरविले.

कंसाचा केशी नावाचा एक पराक्रमी भाऊ होता. त्याच्याकडे कृष्णाला मारण्याची कामगिरी त्याने सोपविली.

केशी लगेचच एका मस्तवाल घोडयावर बसून गोकुळात गेला. तेव्हा कृष्ण आपल्या सवंगडयांसह गाईवासरं घेऊन वनात जात होता, केशीने त्यांना वाटेतच गाठलं. कृष्णाचे सवंगडी घाबरून गेले व कृष्णाला म्हणाले, “तू त्या भयंकर घोडयाच्या वाटेला जाऊ नकोस.”

तो घोडा कृष्णावर धावून आला. कृष्णाने त्याच्या तोंडावर असा जोरात फटका मारला की तो घोडा धडपडून खाली पडला. त्याच्यावर स्वार झालेला केशी खूप जोराने खाली आपटला व तत्काळ मरण पावला. घोडयाला एक-दोन फटके मारताच तोही तडफडून मेला.

कृष्णाने केलेला हा पराक्रम पाहून सगळया गोपालांस आनंद झाला. त्यांनी सर्वांनी कृष्णाचा जयजयकार केला.

9. कंसाचा वध

kans defeat story in marathi

"मथुरेमध्ये कुस्त्यांचा मोठा उत्सव करण्याचं ठरलं. त्यासाठी मोठा मंडप करण्याच काम अक्रुराकडे दिल होत.

कंसाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोठा मंडप उभारला गेला. त्यामध्ये कुस्त्या पहायला येणाऱ्या लोकांसाठी बसण्याची सोय केली होती. मंडपाच्या मध्यभागी कुस्त्यांसाठी एक मोठा हौद तयार केला गेला. त्या हौदाजवळ मथुरेचा राजा कंस याला बसण्यासाठी सुंदर सिंहासन ठेवलं होतं.

सगळी व्यवस्था झाल्यावर एके दिवशी अक्रुर एक सुंदर रथ घेऊन गोकुळात गेला. त्याने नंद व कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना कंसाचा निरोप सांगितला.

कृष्णाला नंद व गोप मंडळी मथुरेस पाठवण्यास तयार नव्हती. मग कृष्णाने सर्वांची समजूत घालून बलरामासह मथुरेस जाण्याचे ठरविले.

यशोदा, नंद व इतर गोपगोपींना कृष्ण जाणार म्हणून दुःख झाल. पण कृष्णाचा निश्चय ठाम होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण व बलराम अक्रुरासह मथुरेस जाण्यास निघाले.

कृष्णाला रस्त्यात देखील मथुरेस जाऊ नये म्हणून गोपगोपींनी विनवणी केली, परंतु कृष्णाने त्यांची समजूत काढली व त्यांना परत गोकुळात जाण्यास सांगितलं.

मथुरेत आल्यावर कृष्ण व बलराम यांच्यासाठी एक मोठा वाडा सजवून तयार ठेवला होता.

कंसाने इकडे आपल्या दरबारातील मुख्य मल्ल चाणूर व मुष्टिक यांना बोलवून सांगितलं की, कृष्ण व बलराम यांना काहीही करून मारून टाका. ते दोघेही लहान मुल आहेत म्हणून बेसावध राहू नका.

कंसाचे एवढयावरही समाधान झाले नाही, तर त्याने आपल्या हत्तीच्या माहुताला बोलावून सांगितलं की, कृष्ण मंडपात येण्यापूर्वी हत्ती दरवाजात उभा ठेव आणि कृष्ण दरवाजात येताच हत्तीला त्याच्या अंगावर सोडून दे.

दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल सुरू झाली. कुस्त्या पाहण्यास मथुरेतील हजारो लोक जमले होते. कृष्ण व बलराम रथात बसून मंडपाजवळ आले तेव्हा ते दोघेही फारच सुंदर दिसत होते. ते दोघे मंडपाजवळ येताच हत्तीने त्यांच्यावर धाव घेतली. कृष्णाने न घाबरता आपले दंड थोपटले व तो हत्तीच्या पोटाखाली शिरला. हत्तीच्या पोटावर त्याने ठोसे मारण्यास सुरूवात केली.

त्यामुळे हत्ती बेजार झाला व कृष्णाला शोधण्यासाठी गुडघे टेकून आपल्या दोन पायांमध्ये त्याने सोंड घातली. त्याबरोबर कृष्ण लगेच बाहेर आला व त्याने हत्तीचे दात खूप जोरानं दाबले. तेव्हा त्याचा एक दात मोडला. कृष्णाने तो मोडलेला दात घेऊन हत्तीच्या कपाळावर जोरदार फटके दिले. त्यामुळे तो हत्ती शेवटी मरण पावला.

ते बघताच कंस मनातून खूपच घाबरला. इकडे हौदामध्ये कुस्त्या सुरू होत्या, परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सर्वांच लक्ष महापराक्रमी कृष्णाकडे होतं. कृष्ण व बलराम मंडपात येताच चाणुर व मुष्टिक हे दोघं मल्ल हौदात उतरले.

त्या दोघांनी आपले दंड थोपटून आपणाबरोबर कुस्ती करण्यास कोणी तयार आहे काय? अस जमलेल्या मल्लांस विचारल, पण कोणीही तयार नव्हते.

तेवढयात बलराम व कृष्ण हौदात उतरले. त्यांची चाणुर व मुष्टिक यांच्याबरोबर कुस्ती सुरू झाली.

त्यांची कुस्ती खूप वेळ चालू होती. त्यानंतर बलरामाने मुष्टिकाच्या छातीवर जोराचा गुद्दा मारला व तो तात्काळ खाली पडला व मरण पावला. तसेच कृष्णाने चाणुरास उचलून फिरवलं व जमीनीवर आपटलं व तो मरण पावला.

कंस मात्र हा सर्व प्रकार बघून खूपच घाबरला, व त्याचे हातपाय थरथर कापायला लागले.

जिथे कंस बसला होता तेथे कृष्ण आला व त्याने कंसाचे केस धरून त्याला सिंहासनावरून खाली ओढलं. कंस आधीच घाबरून गेलेला असल्यामुळे जमीनीवर आदळताच त्याचा मृत्यू झाला.

कंसाच्या मृत्यूमुळे मथुरेच्या प्रजाजनांना फार आनंद झाला. श्रीकृष्णाने मथुरेच राज्य परत उग्रसेनाला दिले.

10. श्रीकृष्णाचे मथुरेतून प्रयाण

krishna chya goshti

"बलराम व कृष्ण हया दोघांच्या मुंजी करून त्यांना वसुदेवाने शिक्षणासाठी उज्जयिनीस सांदीपनी नावाच्या एका थोर गुरूंकडे पाठवले.

गुरूंकडे राहून त्यांनी दोघांनी वेदविद्या व शस्त्रविद्या यांचे शिक्षण घेतले. त्यांची गुरूभक्ती, हुशारी व मेहनत पाहून गुरूजी संतुष्ट झाले. तेथे सहा महिने राहून बलराम व कृष्ण हे दोघेही विद्या संपादन करून परत आले. त्यांना पाहून सगळयांना खूप आनंद झाला.

कृष्णाला मारण्यासाठी कंसाचा सासरा जरासंध मथुरेवर चालून आला. परंतु कृष्णाने त्याचा पराभव केला.

त्यानंतर लवकरच विदर्भाचा राजा महान भीष्मक याची कन्या रूक्मिणी हिजबरोबर कृष्णाचं लग्न झाल. हे जरासंधाला आवडले नाही म्हणून त्याने परत मथुरेवर स्वारी केली. तेव्हा आपल्यामुळे मथुरेतील लोकांना त्रास होऊ नये म्हणून कृष्ण यादवांसह मथुरेतून बाहेर पडला.

त्याने समुद्रकिनारी व्दारका नावाचं एक नवीन नगर वसवल व तो तिथे सुखाने राज्य करू लागला.

Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

या होत्या काही श्री कृष्ण च्या मराठी कथा (Krishna Stories in Marathi) जर तुम्हाला ह्या कृष्ण कथा आवडल्या असेल तर आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या कथा आपल्या मित्रां बरोबर share करा.

1 Comments

Post a Comment

Previous Post Next Post