माझे आवडते शिक्षक मराठी भाषण - My Favourite Teacher Speech in Marathi

आज मी तुमच्या करीता सम्पुर्ण माझे आवडते शिक्षक मराठी भाषण (My Favourite Teacher Speech in Marathi) भाषेत तयार केला आहे. आशा करतो तुम्हाला नक्की आवडेल.

My Favourite Teacher Speech in Marathi

माझे आवडते शिक्षक मराठी भाषण

सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित मान्यवरांना व माझ्या आदरणीय शिक्षकांना सविनय नमस्कार ! माझ्या सवंगड्यांनो...

' खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
'कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे ...

ही शिकवण देणारे सानेगुरुजी... थोर ! मुलांना गोष्टीतून ज्ञान देणारे संस्कार घडविणारे एक आदर्श शिक्षक. अगदी साधे पण बुद्धिमान ! मंडळी, असेच एक शिक्षक माझ्या भाग्याला आले. ' भावे गुरुजी... ' विचित्र वाटतंय ना ' गुरुजी ' शब्द ऐकल्यावर कारण...

भाग्य मराठीचे गेले दिसू लागले फ्यूचर
गुरु लोपले अंधारी त्यांचे झालेत ' टीचर '

आमच्या भावे गुरुजींना ही आंग्ल संस्कृती मान्य नाही. ते म्हणतात ' विद्यार्थ्यांना असावं लागत गुरुंच पाठबळ. त्यांचे आशौर्वाद. ज्ञान देणाऱ्याला गुरुजी म्हणायचं ! ' सर ' म्हणाला तो काय साहेब आहे होय तुमचा ? '

गुरुजी नुकतेच, एक पाच-सहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. पण आजही त्याचं धोतर पांढरे शुभ्र परीटघडीचं..: त्यावर सदरा तो ही पांढरा स्वच्छ ! ताठ चालणं ही तेच आणि चालण्यातला रुबाब... दरारा ही तोच ! काळे-सावळे भावे गुरुजी. पण त्यांची उंची, मजबूत बांधा आणि करारी नजर... आजही तीच ! गुरुजींचं व्यक्तिमत्वच रुबाबदार आणि दबदबा निर्माण करणारं ! खरं तर माझ्या आठवणीत गुरुजी कधीच उंच पट्टीच्या आवाजात कोणाला रागावलेले वा मोठ्यानं बोललेले मला स्मरत नाही... तरीसुद्धा प्रत्येक विद्यार्थी त्यांना वचकून ( टरकून म्हणा. ना !) असायचा. शिक्षक बंदात सुद्धा त्यांचा दबदबा होता.

कारण प्रचंड अभ्यास ! आपल्या विद्यार्थ्यांना जे द्यायचं त्या विषयांचा अभ्यास जसा गाढा होता... तसा शिक्षकी पेशाच्या नियमांचा देखील अभ्यास होता. शालेय नियमांच गाढ ज्ञान त्यांना होतं.

गुरुजी स्वत: खूप शिस्तप्रिय आहेत. आजही सकाळी सहा वाजता... सकाळचे फिरुन घरी परतताना ते तुम्हाला दिसतील. नीटनीटके पणावर आणि वेळेचं बंधन पाळण्यावर त्यांचा प्रचंड भर असतो. एखाद्या कार्यक्रमाला गुरुजींना बोलावणं असेल. तर त्या संयोजकांनाच प्रचंड टेंशन असतं... ' कार्यक्रम वेळेवर सुरु करण्याचं ' ( नाहीतर आपल्याला सवय असते ना इंडियन टाईम' नुसार वागण्याची!)

गुरुजींच्या हाताखालून अनेक पिढ्या घडल्या. आजही सर्वजण त्यांच नाव काढतात. सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदर वाटतो. प्रेम वाटतं !

आता माझंच बघा ना ! माझे बाबा त्यांचे विद्यार्थी... मी ही त्यांचा विद्यार्थी... आणि आता माझा छोटा भाऊ तो ही त्यांचाच विद्यार्थी ! कसा? चौथी आणि सातवी या दोन स्कॉलरशीप मार्गदर्शनाबाबतीत... तयारी करुन घेण्याबाबत गुरुजींचा हात्त धरणारं कुणी नाही. आज निवृत्तीनंतरही गुरुजींचं ज्ञानदान असचं चालू आहे! त्यासाठी कोणतीही-कसलीही फी ते आकारत नाहीत वा भेटी स्वीकारत नाहीत.

बाबा म्हणत्तात ना “ गुरुजींच्या शिकवण्याचा जोश अजूनही तोच आहे.

माझे काही मित्र मला नेहमी विचारतात, ' तुझं अक्षर, तुझ्या बाबांच अक्षर एवढं कसं सुरेख ?... ' मी एकदा म्हणालो ' काही नाही. भावे गुरुजी ! ' ...खरंच ही गुरुजींचीच देणगी. लिहायला कसं बसायचं ? पेन कसं धरायचं ? वही कशी धरायची ? इथंपासून सर्व गोष्टी ते प्रेमानं शिकवतात. एकदा काय झालं... माझ्या एका थित्रानं पेन अगदी रिफिलच्या टोकला पकडलं नि लिहू लागला. गुरुजींचे लक्ष त्याकडे गेलं, म्हणाले, बाबा रे लेखणीची मानगुट पकडलीस ( ' पेन ला ते लेखणी म्हणतात.) तर कशी रे श्वास घेणार ती ? मग वहीवर चालणार कशी ? गुदमरुन मरुन जाईल ना ! " तेव्हापासून तो पेन सरळ धरुन व्यवस्थित लिहू लागला... आजवर हस्ताक्षरात पहिलं बक्षीस काही सोडलं नाही पठ्ठ्यानं !

एखाद्याची चूक दाखविताना गुरुजी नेहमीच असं मजेदार बोलतात. पाठीत वाकून बसणाऱ्या विद्यार्थ्यांला विद्यार्थरिनीला कोपऱ्यात उभी करुन ठेवलेल्या वेताच्या छडीकडे बोट दाखवत म्हणतात, ' ती कोपऱ्यातली मावशी आहे ना ! ती पाठीशी लागली की पाठीचा कणा आपोआप ताठ होतो ! पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी कुणाला साधी चापट मारल्याचे देखील कुणालाही स्मरत नाही... ऐकिवात नाही.

मुलचं आपण ; गृहपाठ करायचा कंटाळा करतोच ! पण भावे गुरुजींचा गृहपाठ मात्र सर्वांचाच तयार असायचा ! पण ही “ भीती पोटी कृती ' नसायची !... भीती वाटायची पण ती आदरयुक्त असायची. आजही आहे.

आठवड्यापूर्वी भेटलेल्या माणसाचं नाव कधी-कधी आपल्याला पट्कन आठवत नाही. पण विद्यार्थी; मग तो कितीही जुना असो; गुरुजी त्याला चटकन ओळखतात. नावानिशी ओळखतात. परवा असेच आम्हाला ते रस्त्यात भेटले. बाबांशी बोलायला थांबले. माझी चौकशी केली. पण बाबांना त्यांनी डॉक्टरसाहेब असे आदरार्थी बहुवचनी संबोधले ! हा त्यांचा घेण्यासारखा गुण. आपल्या विद्यार्थ्यांची समाजातली पत ते सांभळतात.

कधी कधी प्रश्न पडतो एवढं सगळं चांगलं वागणं कसं जमत गुरुजींना ? जर गुरुजींना जमतं तर सर्वांनाच का नाही जमत?

गुरुजींचं वागणं आत-बाहेर वेगळं नसतं. ते शिस्तप्रीय असले तरी मायाळू आहेत. कुटुंब वत्सल आहेत. त्यांच्या स्वत:च्या मुलांवर जशी माया करतात तशीच ते आमच्याबरही करतात. मागे बाबांच्या एका मित्राची जोशी काकांची कसली तरी मोठी शस्त्रक्रिया... खर्चिक अशी करायची होती. त्याला ते परवडणारं नव्हतं. गुरुर्जीच्या कानावर ही बातमी गेली. समाजातलं आपलं वजन वापरुन अनेक मदतीचे हात त्यांनी काकांच्या पाठीशी उभे केले... काकांचे प्राण वाचवले. आपल्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचविण्यासाठी धडपडणारे मी पाहिलेले हे एकमेव शिक्षक !

वाईट एवढंच वाटतं की त्यांच्या गुणांची-बुद्धिची कदर व्हायची तशी झाली नाही. निदान निवृत्त होताना तरी ते मुख्याध्यापक म्हणून निवत्त व्हायला हवे होते. पण त्यांना याची अजिबात खंत नाही ! त्यांना वाटतंय ते फक्त समाधान ! विद्यार्थी आदर्शवत घडवल्याचं समाधान ! म्हणूनच त्यांचे पाय धरावेसे वाटतात.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती... तेथे कर माझे जुळती ....

धन्यवाद

तुम्हाला माझे आवडते शिक्षक मराठी भाषण (My Favourite Teacher Speech in Marathi) कस वाटलं हे कंमेंट करा. आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

दिवाळी मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण

माझी शाळा मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

Post a Comment

Previous Post Next Post