15 Shivaji Maharaj Stories In Marathi | शिवाजी महाराज कथा | Shivaji Maharaj Goshti

छत्रपती शिवाजी महाराज हे खूपच महान मराठा शासक होते व त्यांनी आपल्या जीवनात खूप लढाया लढल्या आणि विजय हासील केली. शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई ची गोष्ट प्रेरणादायक आहे.

Shivaji Maharaj Stories In Marathi

त्यांमधून या काही शिवाजी महाराजांच्या कथा (Shivaji Maharaj Stories In Marathi) जे या आर्टिकल मध्ये सादर करत आहो. या शिवाजी महाराजांच्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडेल.

Contents


1. बाजीप्रभूंना वीरगती

baji prabhu veergati story in marathi

 Shivaji Maharaj Stories In Marathi : आदिलशहाने आता शिवरायांपुढे हात टेकले होते, कारण रोजच काही तरी नवीन घटना घडत होत्या त्यामुळे तो फारच काळजीत पडला होता. यासाठी काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता.

आदिलशहा अशा परिस्थितीत असतानाच त्याच्याकडे कर्नूलगडचा सरदार सिद्दी जौहर हा दाखल झाला. त्याने आदिलशहाला विश्वास दिला की, “तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी मी त्या शिवरायांना पकडल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग त्यासाठी मला कितीही वेळ लागला तरी चालेल. शिवराय ज्या किल्ल्यावर असतील तेथेच त्यांना वेढा घालतो आणि मग गडावरचा दाणागोटा संपला तर त्यांना आपल्याला शरण यावेच लागेल.”

जर शिवराय पन्हाळयावर असतील तर ते पूर्णपणे अडकणार; कारण त्या गडाला चोरवाटा देखील नाहीत व भुयार देखील नाही. मग ते निसटून कोठे जाणार? विशाळगडाशिवाय दुसरा गड नाही म्हणून त्या गडाला देखील वेढा घालीन. तुम्ही बघाच मग ते माझ्या कचाटयात कसे अडकतात ते. आपण त्यासाठी दिल्लीच्या औरंगजेबाची देखील मदत घेऊ कारण त्याला देखील शिवरायांनी त्रास दिलेला आहे.”

आदिलशहाला सिद्दी जौहरच्या बोलण्यामुळे खूप धीर आला व आनंद देखील झाला. कारण सिद्दी जौहर हा अतिशय कठोर शिस्तीचा आणि जे तो बोलतो ते तो करून दाखवतो असा होता म्हणूनच आदिलशहाने लगेचच ‘सलाबतजंग’ हा किताब देऊन त्याचा गौरव केला. त्याने सिद्दीला भरपूर फौज, शस्त्रास्त्रे, दाणागोटा दिला. त्याशिवाय औरंगजेबाची मदत मिळविण्यासाठी त्याला निरोप देखील पाठविला. सिद्दी जौहर हा मान-सन्मान मिळाल्यामुळे खूपच खुश झाला होता. सिद्दी प्रचंड फौज, भरपूर शस्त्रात्रे, दारूगोळा आणि हुशार सरदार बरोबर घेऊन पन्हाळगडाकडे निघाला.

पन्हाळगडावर शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी लगेच योजना तयार केली व त्याप्रमाणे त्यांनी आदिलशहाच्या फौजेची विभागणी व्हावी, या हेतूने सरसेनापती नेताजी पालकर यांच्याबरोबर भरपूर फौज देऊन त्यांना आदिलशाही मुलखाची धूळधाण करायला पाठविले.

सिद्दी जौहर मोठया फौजेबरोबर कोल्हापुरावर चालून येत आहे, असे शिवरायांना समजताच त्या प्रचंड मोठया फौजेसमोर मैदानावर लढायला आपले बळ कमी पडणार असे लक्षात येताच त्यांनी कोल्हापूर ठाणे मोकळे करून आपली सर्व फौज पन्हाळगडावर आणली.

सिद्दीच्या आता आपोआपच कोल्हापूर ताब्यात आले. त्यानंतर त्याने पन्हाळगड व विशाळगडाला वेढा दिला. तेव्हा पावसाळा देखील सुरू झाला होता. असे तीन महिने होत आले तरी सिद्दी गडाला वेढा देऊन वाट पाहात होता. त्यात भर म्हणून राजापुरचे इंग्रज अधिकारी लांब पल्ल्याच्या तोफा आणि भरपूर तोफगोळे घेऊन सिद्दीच्या मदतीला आले, तर औरंगजेबाने आपले मामा शाहिस्तेखानाला मोठी फौज देऊन स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालायला दक्षिणेत पाठवले. शाहिस्तेखानाने बरोबर त्याप्रमाणे दक्षिणेत येऊन मुलूख जाळीत, लुटालूट करीत धुमाकूळ घातला आणि शेवटी त्याने पुण्यात येऊन शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.

सिद्दी जौहरचा पन्हाळयाचा वेढा उठण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. गडावरील दाणागोटा आणि गुरांचा चारा आत संपत आला होता. आता काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे असे ठरवून शिवरायांनी एका रात्री अतिशय गुप्तपणे आपल्या हेरांना गडावरून निसटून जाण्यासाठी एखादी चोरवाट कुठे मिळते का ते पाहण्यासाठी बाहेर पाठविले. त्याप्रमाणे ते हेर पुन्हा गडावर आले व त्यांनी शिवरायांना त्याची माहिती दिली.

शिवरायांनी रात्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून कसे निसटून जायचे, याची युक्ती सांगितली. ही युक्ती पार पाडणे अतिशय कठीण होते परंतु त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता.

दुसऱ्या दिवशी शिवरायांचे वकील शिवरायांच्या सही-शिक्क्याचे पत्र आणि शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरून सिद्दी जौहरच्या छावणीकडे गेले व त्याला राजांचे पत्र दिले.

सिद्दीने ते पत्र वाचले तेव्हा त्याला व त्याच्या फौजेला फार आनंद झाला. आता आपली मोहिम यशस्वी होणार याची त्यांना खात्री वाटली. शिवरायांनी त्या पत्रात लिहिले होते की, ‘आमच्याकडून खर तर खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही खरे तर आपल्यासारख्या हुशार सरदारापुढे केव्हाच शरण यायला पाहिजे होते. आपणास त्यामुळे उगीचच त्रास झाला. परंतु आता झाले ते झाले. आपण आता ते विसरून जावे. जर आपण शपथेवर आमच्या सुरक्षिततेची खात्री देत असाल तर उद्याच रात्री आम्ही आमच्या काही साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवून, हात बांधून आपल्यासमोर हजर होऊ आणि गड आपल्या स्वाधीन करून आपल्या बरोबर विजापुर दरबारात येऊ.”

शिवरायांचे ते पत्र वाचून सिद्दीला मनातून खूपच आनंद झाला परंतु तसे न दाखविता शिवरायांच्या वकिलांना तो म्हणाला, “आम्ही रक्ताची शपथ घेऊन सांगतो की, आमच्याकडून किंवा इतरांकडून शिवरायांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा दगा होऊ देणार नाही.”

सिद्दीचे हे बोलणे खोटे आहे हे राजांच्या वकिलांनी ओळखले होते परंतु त्याने तसे न भासविता ते सिद्दीचा निरोप घेऊन गडावर परत आले.

फाजलखानाने सिद्दीला सावध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगितले की, ‘मी अफजलखान नव्हे. आम्ही सर्व विचार करूनच मोहिमा आखतो. आता फक्त तुम्ही बघत राहा की आम्ही त्या शिवरायांची कशी फजिती करतो ते.’

शिवराय आता हात बांधून शरण येणार ही बातमी कळताच सिद्दीच्या फौजेला खूप आनंद झाला होता. कारण त्यांनी चार महिने पावसात मनात सारखी भीती धरून घालवले होते. दोन घास देखील त्यांनी कधी सुखाने खाल्ले नव्हते म्हणून फौज फार कंटाळली होती. त्यातच आता शिवराय शरण आल्यावर आपल्याला विजापुरात परत जाता येणार यामुळे सर्व सैनिक खाणे-पिणे, नाच-गाणे यामध्ये मशगुल होते त्यामुळे गडाचा वेढा सैल झाला व शत्रू गाफिल झाला.

शत्रू गाफिल आहे हे बघताच पाच-सहाशे मावळे आणि बाजीप्रभू यांच्यासह शिवराय गडावरून गुपचूप बाहेर पडले.कोणी घोडयावरून तर कोणी पायी निघाले. शिवरायांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला शिवा न्हावी वेषांतर करून शिवाजीराजे बनला होता. शिवराय घोडयावरून निघाले आणि शिवराय बनलेला शिवा न्हावी पालखीत बसून निघाले. ते पुढे-पुढे सरकत आणि पहारे चुकवत निसरडया उताराजवळ आले व एक-एक जण सावधगिरीने खाली उतरून विशाळगडाच्या वाटेला लागले.

सिद्दीच्या एका माणसाने राजांची पालखी व मावळयांना वाटेत बघितले व तो लगेच त्याच्याकडे गेला. त्याने त्याला सावध करीत सांगितले, “शिवराय पालखीत बसून विशाळगडाकडे पळून चालले आहेत.”

शिवरायांना माहितच होते की, ही बातमी सिद्दीपर्यंत पोहोचणारच आहे म्हणूनच त्यांनी वेषांतर केले होते. शिवराय व बाजीप्रभू व इतर मावळयांसह एका आडवाटेने विशाळगडाकडे अतिशय वेगाने निघाले.

शिवराय पालखीत बसून पळाले हे सिद्दीला समजले. सिद्दीने लगेचच आपला जावई मसूदला काही फौज देऊन शिवरायांच्या पाठीमागे पाठविले. मसूद धावत गेला आणि पालखीत बसलेल्या राजांना काही वेळातच पकडून घेऊन आला.

पालखीतून उतरलेल्या राजांना सिद्दीने तंबूत नेऊन गादीवर बसवले व तो म्हणाला, “काय राजे, आज तुम्हाला माझ्या रूपाने शेरास सव्वाशेर भेटला की नाही?”

तितक्यात एक हेर सिद्दी जौहरकडे पाहात म्हणाला, “खाविंद, हे काही खरे शिवराय नाहीत. हा तर शिवा न्हावी शिवरायांसारखा वेष केलेला.”

ते ऐकताच सिद्दी खूपच खजील झाला. ही गोष्ट जर बेगम साहेबांना समजली तर आपले काही खरे नाही, असा विचार करून त्याने परत आपल्या जावयाला खऱ्या शिवरायांना पकडून आणण्याचा हुकूम दिला.

मसूद लगेचच मोठी फौज घेऊन शिवरायांच्या पाठलागावर निघाला. तेव्हा शिवराय व मावळे दमून गजापूरच्या खिंडीजवळ आले होते. तेवढयात त्यांना सिद्दीचे सैन्य पाठलाग करीत आहे असे समजले. तेव्हा शिवराय म्हणाले, “आता दुश्मन जवळ आलेला दिसतो व त्याची फौज देखील मोठी आहे. आपली फौज फार तर पाच-सहाशे. त्यातही ती धावपळ करून थकलेली आहे. परंत तरी देखील आता प्राणपणाने लढण्याशिवाय गत्यंतर नाही.”

ते ऐकून मावळे आणि बाजप्रभूने शिवरायांना पुढे जाण्याची विनंती केली व सांगितले, “लाख मरोत; परंतु लाखोंचा पोशिंदा जगो, अशी म्हण आहे. आमच्यासारखे अनेक सेवक मिळतील; पण स्वराज्याचा तारणहार शेकडो वर्षातून फक्त एकदाच जन्म घेतो. आपण घाई करा महाराज आणि काही मावळे घेऊन विशाळगडाकडे जा. गडावर पोहोचताच तोफांचे तीन बार उडवा. तोफांचे आवाज कानी पडेपर्यंत आम्ही आमच्या छातीचा कोट करून लढू आणि शत्रूला ही खिंड ओलांडू देणार नाही.”

शिवराय अतिशय जड अंतःकरणाने काही मावळयांना बरोबर घेऊन विशाळगडाकडे निघाले.

शिवराय गेल्यावर मावळे आणि बाजीप्रभू खिंड लढवण्यासाठी उभे राहिले. त्यातील काही मावळे खिंडीच्या वरच्या बाजूला गेले. तेवढयात दोन-दोन करीत गनिम मावळयांवर चालून आले.

खिंडीच्या वर असलेल्या मावळयांनी ‘हर हर महादेव’ अशी गर्जना केली व मोठ-मोठे दगड घेऊन त्यांनी शत्रूच्या अंगावर टाकायला सुरूवात केली. शत्रूची डोकी फुटून ते रक्तबंबाळ होत होते. बाजी व मावळे हे जीव खाऊन लढत होते. पराक्रमाची शर्थ करीत खिंडीत पाय रोवून पहाडासारखे उभे होते. भराभर शत्रूची मुंडकी उडवत प्रेतांचा खच पाडत होते. काहीजण लढता लढता स्वःत देखील कोसळत होते. तेवढयात बाजीचा भाऊ एका बाणाने धरणीवर कोसळला. परंतु तरी देखील बाजीप्रभू मात्र प्राणपणाने लढतच होते. ते बघून मावळे जोरदार लढू लागले होते. शत्रूच्या माना ते सपासप कापत होते.

बाजीप्रभू देखील रक्ताने न्हाऊन निघाले होते परंतु तरी देखील त्यांच्या हातातील तलवार त्यांनी सोडली नाही. त्यांचे सर्व लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते. आता ते भोवळ येऊन जमिनीवर कोसळणार इतक्यात धडाम, धडाम असा तोफांचा आवाज आला. शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले हे जाणून बाजीप्रभूंनी सुखाने आपले प्राण सोडले.

शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचून बाजीप्रभू व मावळयांची वाट बघत होते. इतक्यात काही मावळे वीर धावतच गडावर आले. बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त झाली हे समजताच शिवरायांना खूपच वाईट वाटले. बाजीप्रभूंच्या पावन रक्ताने गजापूरची खिंड पावन झाली व तेव्हापासून त्या खिंडीचे नाव ‘पावनखिंड’असे पडले.

शिवरायांनी गजापूर खिंडीत ज्यांनी शौर्य गाजविले होते अशा मावळयांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. जे लोक जखमी झाले होते त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. मावळयांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यानंतर शिवराय बऱ्याच दिवसांनी माँसाहेब आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी राजगडाकडे गेले.

Read Mahabharat Stories in Marathi | महाभारत कथा मराठीत

2. क्रूर सुलतान


shivaji story in marathi

Shivaji story in marathi: देवगिरीचा यादवकाळ हा अतिशय भरभराटीचा होता. तेथील प्रजा आनंदी होती. महाराष्ट्राच्या लोकमाता म्हणजेच भीमा, कृष्णा, गोदावरी, इंद्रायणी यांनी महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् केली होती. सह्यगिरी देखील महाराष्ट्राचे रक्षण करीत होता. शेते पिकत होती. दूध-दुभते मुबलक होते. सगळी कोठारे धान्याने भरलेली होती. सण, उत्सव आले की सगळयांना अगदी जोश यायचा व सर्वजण मिळून एकत्र येऊन आनंद साजरा करायचे.

नाशिक, नेवासे नगरीमध्ये विद्येचा सुकाळ होता. सरस्वती विलसत होती. अलंकापुरीला वैभव प्राप्त झाले होते. संतवाणीने अज्ञानरूपी अंधःकार दूर होत होता. थोडक्यात असे म्हणावयास हरकत नाही की, महाराष्ट्राची भूमी ही पावन झाली होती.

महाराष्ट्राचे वैभव यादवकाळात शिखरावर पोहोचले होते. अगदी खऱ्या अर्थाने राजा रामदेवरायाचा काळ हा सुवर्णकाळ होता. साहित्य, कला, वैद्यकशास्त्र यातील प्रगती प्रशंसा करण्यासारखी होती. परंतु हे फार काळ टिकले नाही.

उत्तरेकडील शत्रू हा महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन धडकला. देवगिरीवर शत्रूने आक्रमण केले. महाराष्ट्राची मंगल व पावन भूमी अफगाणी सैन्याने भ्रष्ट केली. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हा विंध्याचल तुडवीत महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आला.

देवगिरीचा राजा रामदेवराय हा अत्यंत शूर होता. तो शत्रूला घाबरून पळून जाणारा नव्हता. राजा रामदेवराय हा निधडया छातीचा होता त्यामुळे त्याने शत्रूचा नक्कीच पराभव केला असता परंतु त्याच वेळी त्याचा पुत्र शंकरदेव हा मोठे सैन्य घेऊन घरभेदी असलेल्या शत्रूचा पराभव करण्यासाठी देवगिरीपासून खूप दूर गेला होता. त्यामुळे राजा रामदेवजवळ अगदी मोजके सैन्य होते. शत्रूने बरोबर या गोष्टीचा फायदा घेतला. राजा तरीदेखील डगमगला नाही. शत्रूचा पराभव करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. मर्द मराठयांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु शत्रूपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

इकडे शंकरदेवाला ही बातमी समजली व तो लगेचच आपली मोठी फौज घेऊन पित्याच्या मदतीस आला. दोन्ही सैन्यात परत घनघोर युध्द झाले. खिलजीला आता आपला पराभव होणार हे दिसू लागले म्हणून त्याने दिल्लीहून मोठी कुमक आल्याची खोटी अफवा पसरविली. त्या बातमीने रामदेवरायाच्या फौजेचे धैर्य खचले व सैनिक माघार घेऊ लागले. रामदेवरायाचा विजय होणार असून देखील खोटया अफवेमुळे त्याचा पराभव झाला.

युध्दात पराभव झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून जबरदस्त खंडणी वसूल केली. त्याने रामदेवरायाचा खजिना पूर्ण रिकामा केला. नंतर त्याने देवगिरी लुटण्याचा हुकूम आपल्या सैन्याला दिला. मग काय, त्याच्या सैनिकांनी तेथू धुमाकूळ घालून सर्व स्त्रिया व मुले यांच्यावर अत्याचार केले. त्यांनी लुटून, जाळून देवगिरी नगरी उध्वस्त केली.

आपल्या प्रजेची अवस्था बघून राजा रामदेवराय फार दुःखी झाला परंतु त्याला काहीही करता येत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवरायाकडून वार्षिक खंडणी देण्याचे करवून घेतले व तो दिल्लीकडे जाण्यास निघाला. तेथे गेल्यावर त्याचे मोठे स्वागत करण्यात आले. दिल्लीचा सुलतान आपण व्हावे म्हणून त्याने दिल्लीच्या आधीच्या सुलतानाची हत्या केली व तो दिल्लीचा सुलतान बनला व तो अजूनच क्रूर झाला.

खिलजीने राजा रामदेवरायाकडून खंडणी वसूल करण्यास सुरूवात केली. काही काळानंतर राजाला खंडणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खिलजी खूपच चिडला व त्याने परत आपला सेनापती मलिक काफूरला सैन्य घेऊन देवगिरीवर चालून जाण्यास सांगितले. पुन्हा एकदा रामदेवराय व त्याचा पुत्र शंकरदेव यांनी अतिशय शर्थीने झुज दिली परंतु त्याच्या राक्षसी ताकदीपुढे देवगिरीचा निभाव लागला नाही. त्यामुळे राजा रामदेवरायाला कैद करण्यात आले. राजाचा अपमान करण्यात आला. इतकेच नाही तर त्याला अंधारकोठडीत टाकण्यात आले. काही काळानंतर नियमितपणे खंडणी देण्याचे राजाने आश्वासन दिले म्हणून राजाची सुटका करण्यात आली. परंतु रामदेवरायाचा अपमान झाल्यामुळे तो मनाने फार खचला होता व त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला.

रामदेररायाचा मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र शंकरदेव हा खूपच संतापला. त्याने दिल्लीच्या सुलतानाला खंडणी न पाठविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ते पाहून खिलजी परत सूडाने पेटला व त्याने परत एकदा मलिक काफूरला मोठे सैन्य घेऊन देवगिरीवर पाठविले.

शंकरदेवाने त्या फौजेशी निकराने झुंज दिली परंतु त्यात त्याला यश मिळाले नाही व दुर्दैवाने लढता लढता त्याचा मृत्यू झाला. शेवटी देवगिरीला कोणी वाली उरला नाही.

सुलतानशाहीने देवगिरी राज्याचे तुकडे पाडले. तेथे सुभेदारांच्या नेमणुका करण्यात आल्या व ते सुलतान स्वतःलाच सुलतान समजू लागले. त्यांच्या अत्याचाराला तेथील प्रजा खूप कंटाळली. प्रजेची ही अवस्था पाहून रामदेवरायाचा जावई हरपालदेव पुढे आला व त्याने प्रजेला धीर दिला. त्याने शत्रूला दहशत बसविली त्यामुळे काही काही का होईना प्रजेला धीर मिळाला. त्याने काही आक्रमकांना यमसदनास देखील पाठवले हे पाहून काही सुभेदार दिल्लीला पळून गेले.

दिल्लीला सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचा मृत्यू झाला. सिहांसनासाठी भांडणे सुरू झाली. या भांडणात मलिक काफूर मारला गेला व कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान बनला. तो देखील अतिशय क्रूर होता. तो देखील काही सैन्य घेऊन देवगिरीवर चालून गेला. हरपालदेवाने देवगिरी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांच्यापुढे त्याचे काही चालले नाही. शत्रूने त्याला ठार केले. देवगिरी परत लुटली गेली. देवगिरीची व्यवस्था पहाण्यासाठी परत जुलमी सरदारांची नेमणूक करून शत्रू दिल्लीला परतला.

परत एकदा त्यामुळे देवगिरीची अवस्था पूर्वीसारखीच दयनीय अशी झाली. ही परिस्थिती असताना दुसरीकडे सुलतानाने नेमलेले सरदार व त्यांचे शिपाई आपली स्वतःची चैन करण्यात मशगुल झालेले होते. त्यांनी प्रजेला अतिशय त्रास दिला. इतकेच नाही तर त्या सरदांरांनी दिल्लीच्या सुलतानाची सत्ता झुगारून दिली व ते स्वतःच सुलतान बनले.

अहमदनगरचा निजामशहा, विजामपुरचा आदिलशहा, बिदरचा बेरीदशहा, गोवळकोंडयाचा कुतुबशहा व एलिचपुरचा इमादशहा या सरदारांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. या प्रदेशात अशा प्रकारे या प्रदेशात पाच सत्ता उदयास आल्या व त्यांनी हिंदू प्रजेला गुलामगिरीत ढकलले व त्यांच्यावर सत्ता गाजविण्यास सुरूवात केली. तेव्हा दिल्लीचे सिंहासन बाबराने बळकावले. दिल्लीत मोगल सत्तेचा उदय झाला जणू काही महाराष्ट्राच्या सुखाला ग्रहणच लागले होते.

Read Sanskar Katha in Marathi | संस्कार कथा मराठीत

3. मालोजींची कामगिरी

shivaji maharaj real story in marathi

Shivaji maharaj real story in marathi: दिल्लीमध्ये मोगलशाहीने आपला जम बसवला तसेच दक्षिणेकडे पाच सुभेदारांनी पाच स्वतंत्र राज्ये स्थापन केली. दक्षिणेत त्यांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू झाला त्यामुळे ते स्वतःला सुलतान समजू लागले. दक्षिणेतील विजयनगर येथील हिंदू साम्राज्यावर सुभेदारांचा डोळा होता. 

विजयनगर हे भरभराटीस आलेले साम्राज्य बळकावण्यासाठी चार सुभेदार एकत्र येऊन ते विजयनगरवर चालून गेले. ही गोष्ट विजयनगरचा राजा रामराया याला समजली व तो देखील आपल्या सैन्यासह युध्दास निघाला. रामरायाने शत्रूला वाटेतच गाठून त्यांच्याशी युध्द करण्यास सुरूवात केली. शत्रूचे सैन्य प्रचंड असल्यामुळे रामरायाच्या सैन्याचा टिकाव त्यांच्यापुढे लागत नव्हता. रामरायाच्या घरभेद्यांनी घात केल्यामुळे त्याला शत्रूच्या ताब्यात जावे लागले. शेवटी निजामशहाने रामरायाचा शिरच्छेद केला व त्याची घोर विटंबना देखील केली त्यामुळेच विजयनगरचा पराभव झाला.

परकीय सुलतानांच्या राजवटीमध्ये प्रजेला अनेक दुःखांना सामोरे जावे लागले त्यामुळे हिंदू साम्राज्ये एकामागे एक अशी धुळीला मिळत होती. क्रूर सुलतानशाहीत प्रजेच्या जीवाची, अब्रूची कसलीच शाश्वती उरली नाही म्हणून सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोक भीतीमुळे सुलतानाचे खोटेच कौतुक करत होते.

लोक सण व उत्सव देखील साजरे करू शकत नव्हते. ते सर्व आपापसात भांडत होते आणि शत्रूचा पराभव करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. काही लोकांच्या मनात मात्र आपल्या संस्कृतीचा अभिमान जागृत होत होता, मनात सूड घ्यायची इच्छा होत होती पण पुढे येणारा कोणी नव्हता.

दिल्लीचा बादशहा अकबर याने आपला मुलगा शहजादा मुराद याला मोठे सैन्य घेऊन दक्षिणेकडे पाठविले. ते बघून निजामशहा, आदिलशहा व कुतुबशहा मुघल सत्तेच्या विरोधात उभे राहिले तेव्हा त्यांच्याकडे बरेच सैनिक हे मराठे व रजपूत होते. मराठेच आपापसात लढत आहेत हे बघून बादशहा व सुलतान यांना मात्र खूप आनंद होत होता. थोडक्यात काय तर बादशहा व सुलतान यांच्या राज्यासाठी हिंदूच एकमेकांना मारत होते.

जर ते सर्व एकत्र येऊन लढले असते बादशहाचा पराभव करू शकले असते. परंतु काही मराठे मात्र या काळोखाकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका वीराची वाट पहात होते. तोपर्यंत ते आपल्या प्रजेचे होणारे हाल व कष्ट फक्त उघडया डोळयांनी पाहात होते.

सर्व महाराष्ट्र गुलामगिरीत अडकला होता आणि त्याच वेळी वेरूळचे बाबाजी भोसले हे राजवंशातले असून सात-आठ गावांची पाटिलकी सांभाळत होते. बाबाजींची मालोजी व विठोजी ही दोन मुले आता मोठी झाली होती. ते दोघेही तलवारबाजी शिकले होते. घृष्णेश्वराचे प्राचीन देवालय वेरूळला होते. या घृणेश्वराची पाटील घराण्याकडून नित्यनियमाने पूजा होत असे.

एकदा मालोजी शेत नांगरत असताना त्यांना खूप सुवर्णमोहरा असलेला हंडा सापडला. तेव्हा त्यांनी ते धन प्रजेच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे ठरविले. मालोजींनी घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच्या पूजे-अर्चेची व्यवस्था लावून दिली. त्यांनी प्रजेच्या संरक्षणासाठी आपल्याकडे घोडेस्वारांची एक लहान फौज उभी केली. परंतु निजामाला वाटले की मोगलांविरूध्द लढण्यासाठी या फौजेचा उपयोग आपल्याला होईल म्हणून त्याने मालोजीकडे दुर्लक्ष केले व त्या दोन्ही भावांना आपल्याकडे ठेवून सरदारकी देखील दिली. प्रजेला होणाऱ्या त्रासातून सोडविण्यासाठी त्यांनी सरदारकी पत्करली व ते योग्य संधीची वाट पाहू लागले.

Read Isapniti Stories in Marathi With Moral | इसापनीती कथा

4. शहाजीराजेंचा विवाह

shahaji raje marriage story in marathi

Shivaji Maharaj Stories In Marathi: नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील उमाबाई यांच्याशी मालोजींचा विवाह झाला. पुढे त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुले झाली. मालोजींनी आपल्या दोन्ही मुलांना युद्धकलेत तयार केले व व्यवहारात देखील त्यांना पक्के केले. शहाजी यांचे वय पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांचा विवाह जिजाबाई यांच्याशी झाला. या जिजाबाई सिंदखेडयाचे सरदार लखूजी जाधवराव यांची कन्या होय. 

जाधवराव हे अतिशय नावाजलेले घराणे होते. आता जिजाबाई भोसले या लक्ष्मी बनून त्या घरात आल्या.
मालोजी आता दरबारी कामकाज पहात होते तेव्हा निजामशहाने त्यांना ‘असाल तसे लढाईवर जा’असा निरोप दिला. त्याप्रमाणे जंगदंबेला नमस्कार करून मालोजी राजे सर्वांचा निरोप घेऊन रणांगणाकडे निघाले. तेथे गेल्यावर मालोजींनी शत्रूशी शर्थीची लढाई केली परंतु अखेरीस इंदापुरच्या लढाईत ते कोसळले आणि शहाजीराजे मात्र एकटे पडले. जहागिरीचे काय असा प्रश्न होताच, परंतु चुलते विठोजी यांनी जहागिरीच्या सनदा शहाजीराजांच्या नावे करून आणल्या. शहाजीराजे निमाशाहीचे सरदार बनले.

मोगलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगर काबीज केले त्यामुळे निजामशाहीची राजधानी दौलताबाद बनले. तेव्हा शहाजीराजे जिजाबाईंसह दौलताबाद येथे राहू लागले. तेथील लोकांवर होणारे अत्याचार बघून जिजाबाईंना फार दुःख होत असे. जिजाबाईंच्या मनात विचार येत असे की, जर हे मर्द मराठे एकत्र आले तर या सर्व परकी सुलतानांचा पराभव करता येईल.

परंतु तसे न घडता वीर मराठे सुलतानशाहीत आपल्याच बांधवांना ठार करत होते. हे सर्व बदलले पाहिजे, पण हे सर्व कोण बदलणार! असा विचार करून जिजाबाईंचा जीव अतिशिय व्याकूळ होत हेाता. शहाजीराजे पराक्रमाची शर्थ करीत होते हे जिजाबाईंना दिसत होते. पण ते निजामासाठी लढत होते. परंतु एकच बाब समाधानाची होती की,लोकांवर होणारे अत्याचार कमी करता यावे म्हणून शहाजीराजे निजामशाहीचे सरदार बनले होते.

दिल्लीचा मोगल बादशहा मोठया सैन्याला घेऊन दक्षिणेत उतरला. त्यामुळे मोगल आणि आदिलशाही सैन्याशी निजामशहाच्या सैन्याची मोठी लढाई झाली. शहाजीराजांचे सासरे लखूजी जाधवराव मोगलांच्या बाजूने तर शहाजीराजे व त्यांचे बंधू शरीफजी निजामशहाच्या बाजूने एकमेकांशी लढत होते. लढता लढता त्यात शरीफजी ठार झाला. शहाजीराजे विजयी झाले परंतु सख्खे भाऊ मात्र गमावून बसले होते.

या पराक्रमामुळे निजामशहाच्या दरबारात शहाजीराजांचा मान वाढला परंतु निजामशहाचा वजीर मलिक अंबर याला ही गोष्ट मान्य नव्हती. तो शहाजीराजांचा अतिशय व्देष करत असे म्हणूनच ते आदिलशाहीत दाखल झाले. त्यामुळे आदिलशहा खूष झाला त्यांनी शहाजीराजांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला. आता लढायांचे प्रमाण वाढले हाते. प्रजेवर अत्याचार होत होते, अन्याय होत होता. हा अन्याय कोण दूर करणार? हा प्रश्नच होता.

Read Love Stories in Marathi | मराठी प्रेम कथा | Romantic Stories in Marathi

5. शिवरायांचा जन्म

shivaji maharaj birth story in marathi

Shivaji maharaj birth story in marathi: सर्व मराठयांनी एकत्र येऊन सुलतानशाहीचा अस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकियांचे प्रजेचे कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे, असे जिजाबाईंना मनापासून वाटत होते. परंतु हे सर्व कसे होणार? कोण करणार? हीच काळजी रात्रंदिवस जिजाबाईंना सतावत असे. त्यामुळे त्या चिंतेने त्यांची झोप उडाली होती.

तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान बादशहा बसला तर इकडे आदिलशहाचा अंत झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहमद आदिलशहा आला. निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि फतेखान वजीर झाला. अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बदलले आणि हे सर्व जण क्रूर, धर्मांध व महाकारस्थानी असे होते. आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजीराजांना लागली होती.

असे असतानाच निजामाने शहाजीराजांना परत आपल्याकडे बोलावले होते. लखूजी जाधवराव देखील निजामाच्या दरबारातच दाखल झाले होते. अशा रितीने सर्व वातावरण अतिशय अस्थिर व अशांत होते. नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याची चाहूल लागली होती. जिजाबाईंचे बाळंतपण सुखरूप व सुरक्षित वातावरणात व्हावे म्हणून शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली होती. शिवनेरी बुलंद गड. त्यावरील गडकरी हे नात्यातले व विश्वासू. जिजाबाईंना तेथेच ठेवायचे असे ठरले. तेव्हा गडकरी विजयरावांनी देखील राजांना खात्रीने सांगितले की, ‘राजे आपण काळजी करू नका व निश्चिंत रहा. आम्ही माँसाहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा.’ शहाजीराजे आता निश्चिंत झाले व परत निजामदरबारी रूजू झाले.

गडावर शिवाईदेवीचे मंदिर होते. तेथे रोज भजन किर्तन चालत असे. रामायण व महाभारत ऐकण्यात जिजाबाई अगदी गुंग होऊन जात असे. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली आणि जिजाबाईंनी देवीला मनोभावे नमस्कार केला व प्रार्थना केली, “माते जगदंबे, या भूमीला दास्यातून मुक्त करणारा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा वीरपुत्र माझ्या पोटी जन्म घेऊ दे.” असे म्हंटल्यावर काही वेळानेच जिजाबाईंनी सुर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला. तो दिवस होता १९ फेब्रुवारी १६३०, हा अतिशय शुभ दिवस होता. कारण, विव्दान पडितांनी त्यांचे भविष्य सांगितले ते असे की, “हा पुत्र दिगंत कीर्ती संपादन करेल व या भूमीला दास्यातून मुक्त करेल. स्वराज्याची स्थापना करेल आणि छत्रपती होईल.” ही पंडिताची मंगलवाणी ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला. पंडितांना द्रव्यदान करण्यात आले.

बाराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले व शिवाजी असे नांव ठेवण्यात आले. शिवाजीराजे. जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. खरोखरच १९ फेब्रुवारी १६३० हा दिवस भाग्याचा व थोर असेच म्हणावयास हवे.

काही दिवसांनी शहाजीराजांनी आपल्या पुणे-सुपे या जहालगिरीलगतचा काही मुलूख जिंकून घेतला तो मुलूख आदिलशाहीतील होता. त्यामुळे आदिलशाहीच्या सैन्याने पुण्याची जाळून राखरांगोळी केली. शत्रूने पुणे लुटले. या बातमीने जिजाबाईंचे मन अतिशय दुःखी झाले. यापूर्वी देखील त्यांनी अशी अनेक मोठी दुःखे पचविली होती.

काही काळानंतर सगळीकडे भीषण दुष्काळ पडला. तरीदेखील जिजाबाई या डगमगल्या नाहीत. या संकटांना आपण अतिशय धीटपणे तोंड दिले पाहिजे असा जणू त्यांनी निर्धारच केला होता. त्यांना एकच आशा होती ती आपल्या पुत्ररत्नाची. माझा हा पुत्रच रामकृष्णाप्रमाणे दुष्टांचा नायनाट करून श्रींचे राज्य स्थापन करील, अशी त्यांची खात्री होती.

बादशहाला शहाजीराजांची गरज उरली नाही त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा मोगलांना सोडून जायचे आणि वेळ येताच या मोगलांना धडा शिकवायचा असे त्यांनी ठरविले. वजीर फत्तेखान हा स्वःत वजीर बनला व मोगलांनी निजाम आणि त्याचा वजीर फत्तेखान यांनाच ताब्यात घेतले. हे पाहून आदिलशहाला वाटले की, मोगलांनी जर निजामशाही कब्जात घेतली तर ते फारच डोईजड होतील व उद्या आपल्यावर देखील हीच वेळ येऊ शकते. हे सर्व शहाजीराजे पाहात होते तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेऊन निजामशहा व आदिलशहा यांना एकत्र आणले.

निजामांचा वजीर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे सैन्याला हुकूम कोण करणार या प्रश्नामुळे शहाजीराजांनी मूर्तजा नावाच्या मुलाला निजामाच्या गादीवर बसविले व ते स्वतः वजीर बनले आणि निजामाच्या नावाने स्वतः राज्यकारभार पाहू लागले.

परंतु या सगळया धावपळीत शहाजीराजांना शिवनेरीवर जाऊन आपल्या पुत्राला मात्र भेटता आले नव्हते, बालशिवबांचे मुख पाहाता आले नव्हते. आता शिवबा मोठे होत होते. वाडयामध्ये सर्वत्र त्यांचे दुडूदुडू धावणे सुरू झाले होते. शिवरायांच्या बाललीला पाहाण्यात दिवस कसा जात होता हे जिजाबाईंना कळत देखील नव्हते.

Read Krishna Stories in Marathi | श्री कृष्ण च्या गोष्टी मराठी मध्ये

6. पिता-पुत्र भेट

Shivaji maharaj marathi goshti

Shivaji maharaj marathi goshti: शिवबा जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांना अनेक सवंगडीदेखील मिळाले. ते त्यांच्याशी खेळण्यात रममाण होत असे. त्यांना मर्दानी खेळ खेळण्यास खूप आवडत असे. जिजामाता शिवबांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगत व ते त्या अतिशय लक्षपूर्वक ऐकत असे. शिवबा त्या गोष्टी लक्षात ठेवून खेळामध्ये राम, कृष्ण किंवा हनुमान बनून आपल्या सवंगडयांशी युद्धाचे खेळ खेळत असत आणि अशा छोटयाशा लढाईत शिवबा विजयी होत असे. थोडे जरी शिवबांच्या मनाविरूध्द घडले तर त्यांना ते आवडत नसे.

जिजामाता शिवबांना काही गोष्टी समजावून सांगत व म्हणत, “शिवबा, आपल्या राज्यात खूप शत्रू आहेत. ते आपल्या लोकांवर अन्याय करून त्यांना खूप त्रास देतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. आपला महाराष्ट्र त्यांच्या अत्याचारामुळे गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष रडतो आहे म्हणून आता तू त्या शत्रूला रडव आणि आपल्या प्रजेला हसव. माझी तुझ्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि ती तू पूर्ण कर.”

शिवबा मातेचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत असे. शिवबांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम झालेला देखील दिसत असे. शूर माणसे रडत नाही तर ती आपल्या शत्रूला रडवतात, हे शिवबांच्या लक्षात आले. शिवबा खेळताना पडले किंवा त्यांना लागले तरी देखील ते तोंडातून काही शब्द काढत नसे व त्यासाठी काही तक्रार देखील करत नसे.

शिवबा कधी-कधी खेळताना मातीचे किल्ले करण्यात खूप गढून जात असे. ते त्यावर मातीची केलेली चित्रे ठेवून लढाईचा देखावा निर्माण करीत. अशा प्रकारे शिवबा लहानाचे मोठे होत होते.

शहाजीराजांनी त्यांच्या पराक्रमाने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. त्यांना आपल्या पुत्राला भेटण्याची खूप ओढ लागली होती. जिजाऊसाहेब देखील त्यांची आतुरतेने वाट बघत होत्या. अखेर शहाजीराजे आपल्या छोटया शिवबाला भेटण्यासाठी गडावर येऊन पोहोचले. गडावर त्यांचे स्वागत झाले. शिवबा देखील आपल्या पित्यास भेटण्यास खूप अधीर झाले होते. प्रथम आल्यावर त्यांनी शिवाईदेवीचे दर्शन घेतले. नंतर जिजाऊंनी पतीच्या पायांना स्पर्श करून त्यांची चरण धूळ मस्तकास लावली. राजे सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा शिवबा त्यांच्या मांडीवर येऊन बसले आणि पिता-पुत्र यांची भेट झाली. खरोखर ते दृश्य बघण्यासारखे होते. जिजाऊंनी तो आनंदाचा क्षण आपल्या डोळयात साठवून ठेवला.

शहाजीराजांचा आपल्या कुटूंबात आनंदात वेळ चालला होता तोच त्यांना कळाले की, बादशहा शहाजहान दक्षिणेवर चाल करण्यासाठी बऱ्हाणपुरास आला होता. त्यांना ताबोडतोब शत्रूचा समाचार घेण्यासाठी जावे लागले. अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी जिजाऊसाहेबांचा आणि बाल शिवबांचा निरोप घेतला.

शहाजीराजांनी स्वतः वजीर बनून निजामशाहीचा कारभार चालू ठेवला आहे हे बादशहाला समजले होते. तेथे आल्यावर त्याने प्रथम आदिलशहाला शहाजीराजांपासून दूर केले. त्यामुळे तो शहाजीराजांची संगत सोडून मोगल बादशहाला जाऊन मिळाला. शहाजीराजे आता एकटे पडले होते. शिवाय त्यात त्यांना उपयोगी पडणाऱ्या सरदार मुरार जगदेव याला आदिलशहाने कपटाने ठार केले. या संकटातून शहाजीराजांना मार्ग काढायचा होता.

Read भुतांच्या गोष्टी | Horror Stories in Marathi | Ghost Stories in Marathi

7. जिजाऊंचे संस्कार

chatrapati shivaji maharaj story marathi

Chatrapati shivaji maharaj story marathi: शहाजीराजे हे अतिशय पराक्रमी आणि शूर योद्धे होते. मोगली सैन्याची व त्यांची समोरासमोर भेट झाली. शहाजीराजे निकराने लढत होते परंतु शत्रू जास्त बलवान होता. आदिलशाही सैन्यापुढे त्यांचे सामर्थ्य कमी पडले आणि शेवटी पाच वर्षे सांभाळलेली निजामशाही शहाजीराजांना सोडावी लागली. शेवटी राजे माहुलीच्या किल्ल्यात आले.

शहाजीराजे आता शत्रूच्या वेढयात अडकले त्यामुळे त्यांनी मनाविरूद्ध आदिलशाहीची सरदारकी स्वीकारली व ते आदिलशाहीचे सरदार झाले. या गोष्टीमुळे मोगल बादशहा घाबरला व त्यामुळे त्याने आदिलशहाला सांगितले की, शहाजीराजांना कर्नाटक प्रांती पाठवावे. बादशहाचे मर्जी राखण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना विजापुरला पाठविले. शहाजीराजे तेथे जाण्यापूर्वी जिजाऊंना भेटण्यासाठी गेले.

शिवबा सहा वर्षाचे झाले होते. जिजाऊ आणि शिवबा यांनी पुण्यास राहावे असे ठरले. पुण्याला जाण्याची त्यांची चोख व्यवस्था केली गेली. पुण्याला जात असताना डोंगर खोऱ्यांची वाट होती. पुण्यात पोहोचल्यावर सर्वत्र पडक्या घरांचे ढिगारे, भग्न वाडे आणि हवेल्या हे सर्व पाहून जिजाऊंना खूप वाईट वाटले आणि पुण्यात कशी बशी जीवन जगणारी काही कुटुंबे बघून त्यांना सुलतानशाहीचा खूपच राग आला.

जिजाऊसाहेब आपल्या पुत्राला घेऊन पुण्यात राहायला आले आहेत हे कळल्यावर सर्व लोकांनी माँसाहेबांना मुजरा करून त्यांचे स्वागत केले. सर्वजण त्यांना माँसाहेब म्हणू लागले. माँसाहेबांनी लोकांना धीर दिला व त्या म्हणाल्या, “आम्ही पुण्यात आलो आहोत, ते दुष्टांनी केलेल्या राखरांगोळीतून नवीन व सुरक्षित पुणे उभारण्यासाठी.”

ते ऐकून लोकांना फारच आनंद झाला. जिजाऊसाहेब व शिवबा यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधण्याचे ठरविले. कसब्याच्या टोकाला, जवळच नदी असलेल्या ठिकाणी लवकरच एक भव्य वाडा बांधण्यात आला. त्या वाडयाचे नांव लाल महाल असे ठेवण्यात आले. तो वाडा घोडयाची पागा, धान्यकोठी, कचेरी, देवघर अशा सर्व सोयींनीयुक्त असा भव्य होता. एक चांगली शुभ वेळ बघून जिजाऊ आणि शिवबा त्या वाडयात राहण्यास आले.

माँसाहेब या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांनी पडक्या देवळांचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. देवळांना डागडुजी आणि नवीन देवळांचे बांधकाम वेगाने सुरू झाले. एका देवालयात माँसाहेबांनी स्वतःच समारंभपूर्वक श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली आणि हेच पुण्याचे आराध्यदैवत कसबा गणपती म्हणून प्रसिद्धीस आले. जिजाऊसाहेब व शिवबा रोज तेथे दर्शनाला जात असत. शिवबा माँसाहेबांना अनेक प्रश्न विचाररून त्याविषयी माहिती मिळवत असत. माँसाहेबांकडून मोगल, निजाम यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास ऐकून बाल शिवाच्या मुठी अतिशय रागाने व संतापाने आवळल्या जात.

माँसाहेब शिवबाला सांगत, “शिवबा, ही भूमी आपली, हा देश आपला; परंतु ते सुलतान व बादशहा बळजबरीने आपल्या लोकांवर राज्य करतात, आपल्या लोकांवर जुलूम-अत्याचार करतात, आपल्या लोकांच्या घरा-दारांची जाळून-पोळून राखरांगोळी करतात, शेतातली उभी पिके घोडयाच्या टापांखाली चिरडतात, ते आपल्या लोकांना गुलामासारखे वागवतात. हे सर्व अत्याचार बघून अत्यंत वाईट वाटते.” माँसाहेबांचे हे बोलणे ऐकून शिवबा फार बैचेन होत असे.

माँसाहेब व शिवबा पुण्यात आल्यापासून पुणे सोडून गेलेले लोक पुन्हा पुण्यात राहू लागले होते. त्यांना त्या दोघाचां खूप आधार वाटत असे. पुण्यातील प्रजेला आता कसलीही भीती वाटत नव्हती, त्यामुळे पुण्याची वस्ती परत वाढू लागली होती.

या लाल महालात शिवबांच्या शिक्षणाची देखील चांगली व्यवस्था केली होती. मुळाक्षरे गिरवणे, लिहायला-वाचायला शिकणे, हत्यारांची माहिती करून घेणे, दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी करणे, तलवारीचे हात करणे, तिरंदाजी, कुस्ती, भालाफेक या गोष्टी शिकत होते. याच बरोबर ते संस्कृत, फारसी या भाषांचे ज्ञान, कचेरीचे कामकाज याची देखील माहिती करून घेत होते.

माँसाहेबांचे त्यांच्या जहागिरीच्या कारभाराकडे पूर्ण लक्ष होते. पुण्यातील लोकांचे जीव आणि वित्त सुरक्षित राहील, याची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केली होती. शेतकऱ्यांना रानटी जनावरांचा खूप त्रास होत असे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचीच गस्ती-पथके उभारली. त्यामुळे रानटी जनावरांचा त्रास कमी झाला व चोर-दरोडेखोर यापासून देखील प्रजेचे रक्षण झाले. शेतकरी सुखी झाले. जहागिरीच्या खजिन्यात भर पडून पुण्यातील व्यापार-उदीम वाढीस लागला. जणू पुण्याचा कायापालटच झाला.

जिजाऊंच्या मनात प्रजेविषयी अतिशय करूणा व दयाभाव होता. त्यामुळे शिवबांना देखील अनेक गोष्टी समजल्या होत्या. शिवबा आपल्या सवंगडयाबरोबर डोगर-दऱ्या हिंडून बघत व कपारी, भुयारे यांची माहिती घेत असत. सर्व प्रजेशी ते जवळीक साधून त्यांना आपलेसे करत व त्यांचे सुख-दुःख जाणून घेत असत.

दऱ्याखोऱ्यात फिरताना शिवबांना मावळयांची मुले भेटत असे. पुढे हेच मावळे शिवाच्या जिवाभावाचे सोबती, सवंगडी बनले. शिवबा त्यांना पुण्यातील वाडयात घेऊन येत असत. माँसाहेब देखील त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागत असे.

शिवबा आता मोठे झाले तेव्हा ते माँसाहेबांच्या कडक शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिकत होते. ते सर्वगुणसंपन्न होत होते. राजाला आवश्यक असणारे सगळे गुण त्यांच्यात होते. माँसाहेबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. त्याच्या अंगी बाणेदारपणा, शौर्य, प्रजेबद्दल प्रेम, अन्यायाविरूध्द चीड असे गुण दिसून येत होते. जुलमी, धर्मांध, परकी सुलतानांच्या गुलामगिरीतून आपली भूमी मुक्त करण्याचे विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागले होते. स्वधर्माचा अभिमान, प्रजेविषयी कळवळा, थोरा-मोठयांचा आदर करणे हे गुण त्यांच्या ठायी दिसून येत होते.

शिवबांचे ते गुण पाहून माँसाहेबांचा ऊर अतिशय अभिमानाने भरून येत असे. त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा शिवबाभोवती केंद्रित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाला सांगत, “शिवबा तुला राम-कृष्णाप्रमाणे कार्य करायचे आहे. दुष्टांचे निर्दालन, पापी जनांचा नाश करून स्वधर्माचे, प्रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केलेस तर माझे समाधान होईल. परक्या बादशहाचा चाकर होण्यात धन्यता मानू नकोस. तुझे वडील फक्त नाईलाजाने परक्यांसाठी लढत आहेत. स्वतंत्र राज्य स्थापन करून तुझ्या वडिलांनी देखील दौलत सांभाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना यश आले नाही परंतु तू आपल्या मात्या-पित्याची ही इच्छा पूर्ण कर. वडिलांनी मिळविलेल्या जहागिरीवर जगण्यात पुरूषार्थ नाही तर काही नवे निर्माण करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे हे तू लक्षात ठेव. स्वराज्य स्थापून तू ‘श्री’ च्या राज्याची स्थापना कर. हीच त्या जगदंबेची, शंभू-महादेवाची इच्छा आहे, हे जाणून घे.”

माँसाहेबांच्या या विचारांनी व शिकवणीने शिवबांचे मन महत्त्वाकांक्षेने स्वाभिमानाने भरून येत होते आणि स्वराज्य-स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती.

Read Sai Baba Stories In Marathi | साई बाबांच्या कथा मराठीत

8. सिंहाचा छावा

sinhancha chava marathi story

शहाजीराजे हे आदिलशहाचे सरदार होते त्यामुळे ते सतत लढाईत गुंतलेले असत. ते बंगळुरला मुक्कामाला होते. या लढायांमुळे त्यांना कर्नाटकात राहावे लागत असे. बंगळूर येथे त्यांनी एक भव्य वाडा बांधला व तेथे त्यांचे दुसरे कुटूंब होते. दुसरी राणी तुकाबाई व त्यांचा मुलगा एकोजी यांच्याबरोबर ते तेथे राहात होते. शहाजीराजे बंगळूरला राहात परंतु मनाने मात्र ते सदैव पुण्याला जिजाबाई व शिवबांकडे असत. त्यांचा शिवबांवर खूप जीव होता. ते मधून मधून शिवबांना उंची भेटवस्तू पाठवत असत.

शहाजीराजांची इच्छा असतानाही त्यांना पुण्यात येणे जमले नव्हते; म्हणून त्यांनी पुण्याला पत्र पाठवून शिवबा व जिजाबाई यांना बंगळूरला बोलावले होते. जिजाऊ व शिवबा दोघेही बंगळूरला आले तेव्हा सगळयांनी त्यांचे स्वागत केले. सगळयांना फारच आनंद झाला. शहाजीराजांनी पुत्राला प्रेमाने जवळ घेतले.

शिवबा बंगळूरला आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, बादशहा-सुलतानांनी येथे आपल्या जुलमी राजवटी स्थापन केल्या, त्यामुळे शिवबांच्या मनात सुलतानाविषयी घृणा निर्माण झाली. शिवबांचे मन तेथे रमत नव्हते हे शहाजीराजांच्या लक्षात आले. 

माँसाहेबांनी शहाजीराजांना सांगितले की, आता शिवबाचे लग्नाचे वय झाले आहे व शहाजीराजांनी देखील त्या गोष्टीला मान्यता दिली. माँसाहेबांना खूप आनंद झाला. 

शहाजीराजांनी आदिलशहाची राजधानीचे शहर विजापूर शिवबांना दाखविले. तेथे काही गोष्टी शिवबांना आवडल्या नाहीत म्हणून त्यांनी आपल्या पित्याला ‘आपण येथे राहणार नाही असे सांगितले. शहाजीराजांची इच्छा होती की, शिवबाने दरबारात जाऊन आदिलशहाची भेट घ्यावी परंतु शिवबांना ते मान्य नव्हते. ते आपल्या पित्याला म्हणाले, “मला क्षमा करा महाराज, आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचे राज्य बुडविणाऱ्या सुलतान बादशहापुढे मान झुकविण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही. आम्ही आई जगदंबा, शंभू महादेव, माता-पिता आदिंपुढे आमचे मस्तक हजारवेळा झुकवू. परंतु त्या क्रूर सुलतानापुढे आमचे शिर कधीच झुकणार नाही.”

शिवबांच्या या सडेतोड उत्तरामुळे शहाजीराजे त्यांच्यावर खूपच खुश झाले. ते शिवबाला म्हणाले, “आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. कारण आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आम्हाला त्यात यश आले नाही. आता आमची अपूर्ण इच्छा तुम्ही पूर्ण कराल अशी आम्हाला खात्री आहे. यापेक्षा आमचे भाग्य ते काय असणार?” असे म्हणून त्यांनी शिवबाला आशीर्वाद दिला.

शहाजीराजे आपल्या मनाशीच म्हणाले, ‘शिवबा बाळराजे म्हणजे हे एक वादळ आहे. हे वादळ आदिलशाहीत कोंडता येणार नाही. हा सिंहाचा छावा या सोनेरी पिंजऱ्यात कधीच राहणार नाही. त्याला मुक्तपणे हिंडू-फिरू दिले पाहिजे व त्यासाठी त्यांना पुण्याला पाठविणे गरजेचे आहे. त्यानंतर शहाजीराजांनी ठरविल्याप्रमाणे शिवबा व जिजाऊ हे दोघेही पुण्याला परत आले.

Read तेनाली राम मराठी कथा | Tenali Raman Stories in Marathi

9. शिवराय-मावळे शपथविधी

shivraay mavle shapat vidhi

Shivraay mavle shapat vidhi: शिवरायांचे क्षात्रतेज हे जास्त तळपू लागले होते. त्यांची न्यायनिष्ठुरता, सचोटी, धैर्य हे गुण पाहून सर्व लोकांच्या मनात स्वराज्याविषयीच्या आशा जागृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे प्रेम, सहकार्य व विश्वास त्यांना मिळू लागला होता.

शिवरायांनी मावळयांसह स्वराज्यासाठी एक अनुकूल असे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे एके दिवशी शिवराय मावळ खोऱ्यातील तरूण सवंगडयांना घेऊन सहयाद्रीच्या खोऱ्यातील रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. तेव्हा पाटील, देखमुख ही मंडळी देखील तेथे आली. शिवराय शिवलिंगासमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवाला अतिशय मनोभावे नमस्कार केला व नंतर ते आपल्या सर्व सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “हे पहा मित्रांनो, माझे पिता शहाजीराजे यांनी जेव्हापासून या जहागिरीचा कारभार हाती घेतला तेव्हापासून येथील प्रजा पूर्वीपेक्षा सुखात आणि निर्भयपणे जगत आहे. परंतु ही जहागिरी कायम आपल्याकडेच राहील, याचा काय भरोसा? लहरी असलेला सुलतान ती आपल्याकडून कधीही काढून घेईल म्हणजेच परत मागचेच दिवस येणार. 

प्रजेवर अन्याय, अत्याचार सुरू होणार. अशा वेळी फक्त परमेश्वराचा धावा करण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील आपल्याला मदतीला येणार नाही. ज्याप्रमाणे श्रीरामप्रभूंनी वानरसेना उभी केली, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील लोकांना एकत्र केले आणि तेव्हाच त्यांनी त्या अत्याचारी राजांचा पराभव केला. त्याचप्रमाणे आपण आज जर एकत्र आलो आणि जिवावर उदार होऊन त्याग करायला तयार झालो, तर आपण आपल्या मुलुखातून जुलमी, अत्याचारी सत्ताधीशांना नेस्तनाबूत करून लोककल्याणकारी अशा स्वराज्याची स्थापना करू शकू. असे स्वराज्य स्थापन व्हावे अशी श्रींची इच्छा आहे. जर आपण एकत्र येऊन अशा कार्याला वाहून घेतले तर महादेव आपणास आशीर्वाद देईल व तो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील. आपण जर या कार्यासाठी तयार असाल तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पडेल ते कष्ट व कोणताही त्याग करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशांनी पुढे यावे आणि श्रींच्या समोर शपथ घ्यावी. कोण तयार आहे बोला?”

शिवरायांचे हे कळकळीचे बोलणे सर्वांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. सर्वजण लगेचच श्रींच्यासमोर उभे राहात म्हणाले, “राजे, श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी आपण आमचे प्राण मागितले तरी आम्ही देण्यार तयार आहोत. या कार्यासाठी आम्ही आपण जे सांगाल ते करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी आहे.”

ते ऐकून शिवरायांना अतिशय गहिवरून आले. त्यांनी प्रत्येकाकडून श्रींच्या पिंडीवरील बिल्वपत्र उचलून ‘स्वराज्य-स्थापनेसाठी मी माझे जीवन समर्पित करीत आहे’ अशी शपथ वदवून घेतली. माँसाहेबांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांचे मन भरून आले.

आदिलशाही दरबारात शिवरायांविषयी वेगळाच समज झाला होता. आदिलशाहीतील शहाजीराजांसारख्या अग्रगण्य सरदाराचा मुलगा असा रानोमाळ का फिरतो? दऱ्या-खोऱ्या का तुडवतो? आपल्या वडिलांच्या जहागिरीत आरामात जगण्याचे सोडून असा उन्हातान्हात का फिरतो? त्या सरदारांना स्वराज्याचे स्वप्न पाहणारे ते जिवाचे रान करणारे शिवराय कसे समजणार होते?

शत्रू हा अतिशय बलाढय होता. शिवाय त्याच्याकडे लाखोंचे सैन्य होते. त्याच्यापुढे टिकाव धरण्यासाठी आपल्याकडे देखील बलाढय अशी सेना हवी, हत्यारे हवी, दारूगोळा हवा, भरपूर धन हवे. हे सर्व कसे मिळवायचे? याची काळजी शिवरायांना लागली होती. परंतु त्यांच्याकडे दूर विचार करण्याची दृष्टी होती म्हणून त्यांच्या मनात गनिमी युद्धाने लढायचे असे होते. तेव्हा असे देखील म्हटले जात की, ज्याच्याजवळ गड असे त्यांच्याच हाती राज्य असे. म्हणून शिवरायांनी प्रथम गड ताब्यात घेण्याचे ठरविले. कारण त्यांच्याकडे कोणताच किल्ला नव्हता.

शिवरायांनी त्यासाठी प्रथम तोरणा गड घेण्याचे ठरविले. हा तोरणा गड अतिशय बुलंद व अवघड होता त्यामुळे आदिलशहाचे याकडे लक्ष नव्हते. एके दिवशी शिवरायांनी आपल्या मावळयांसह या गडावर आगमन केले व तेथे त्यांनी आदिलशहाचे निशाण काढले व आपला भगवा झेंडा फडकावला. तेथे त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. गड त्यांच्या ताब्यात आला.

गडावर तोरणाईचे मंदिर होते. तेथे शिवरायांनी देवीची प्रार्थना करून तिचा आशीर्वाद घेतला. यानंतर शिवरायांनी गडावर दारूगोळा, हत्यारे, यांचा भरणा केला. काही पडझड झालेल्या बुरूजांची दुरूस्ती केली. तोरणा गडावर त्यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला, हे ऐकून जिजाऊंना खूपच आनंद झाला.

तोरणा गडाच्या बुरूजांच्या दुरूस्तीचे काम करताना एका बुरूजात भरपूर असे धन सापडले. खरोखर ही तर जगदंबेचीच कृपा म्हणावी लागेल. स्वराज्याची उभारणी करण्यासाठी या धनाचा उपयोग करण्याचे शिवरायांनी ठरविले.

शिवराय जेव्हा लाल महालात परत आले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. काही सुवासिनींनी त्यांच्या पायांवर पाणी घातले. सौभाग्यवती सईबाईंनी हातावर साखर ठेवली. शिवरायांनी माँसाहेबांना वाकून नमस्कार केला. तेव्हा माँसाहेबांना अतिशय आनंद झाला होता व त्यांनी शिवरायांना आशीर्वाद दिला व त्या म्हणाल्या, “राजे, आपण योग्य तेच केले. आई जगदंबेने तुम्हाला हत्तीचे बळ दिले आहे. योग्य वेळी योग्य कार्य हाती घ्या.”

शिवरायांनी त्या दिवशी रात्री आपल्या सहकाऱ्यांबरोबर भोजन केले. त्यानंतर गडावरील सापडलेल्या धन-संपत्तीविषयी माँसाहेबांशी विचार-विनिमय करून त्याचा उपयोग कसा करायचा ते ठरविले. त्या धनातून दारूगोळा व इतर साधन-सामग्री खरेदी करून बाकी धन मोठया कार्यासाठी राखून ठेवण्याचे ठरले.

तोरणा गडावरून थोडे अलिकडे मुरंबदेवाच्या डोंगरावर एक बळकट किल्ला बांधण्याचे शिवरायांनी ठरविले होते. त्याप्रमाणे गडाच्या बांधकामास सुरूवात झाली. किल्ला अतिशय वेगाने बांधून तयार झाला. गडावर भगवे निशाण फडकावले. राजवाडा, कचेरी अशी बांधकामे पूर्ण होताच गडावर काही राखीव फौज ठेवली. शिवरायांनी या गडाचे नांव ‘राजगड’ असे ठेवले आणि हाच गड स्वराज्याच्या राजधानीचा गड बनला.

Read अकबर बिरबल मराठी गोष्टी | Akbar Birbal Stories in Marathi

10. स्वराज्याचा झेंडा

swarajyacha jhenda story in marathi

 Shivaji Maharaj Stories In Marathi: शिवरायांनी तोरणा गड घेतला आणि त्यामुळे प्रजेला स्वराज्य आता जवळ आले आहे असे वाटू लागले होते. लोकांना शिवराय आपलेसे वाटू लागले म्हणून लोक शिवरायांना ‘राजे’ असे म्हणू लागले होते.

राजगड स्वराज्याची राजधानी झाली असल्याची बातमी सगळीकडे पसरली. सर्व लोकांना खूपच आनंद झाला. परंतु काही लोकांना राजांचे हे कर्तृत्व सहन झाले नाही. काही परकीय जे सुलतानाच्यापुढे हाजी हाजी करणारे होते त्यांना राजांचा मत्सर वाटू लागला होता. आजपर्यंत जे कोणाला शक्य झाले नाही ते हा एवढासा मुलगा काय करणार? ही गोष्ट त्यांना रूचली नाही.

हे लोक तक्रार करण्यासाठी शिरवळला गेले व तेथे आदिलशाही ठाणे अंमलदार अमीन रहीम अहमद याला त्यांनी सांगितले, “शहाजीराजांच्या मुलाने तोरणा आणि मुरूंबगड ताब्यात घेतले आणि त्याने गडाची डागडुजी देखील केली आहे. तो तेथे स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी हालचाल करतो आहे.”

अमीनमियाला या गोष्टीतील गांभीर्यच कळाले नाही. स्वराज्य स्थापणे म्हणजे पोरखेळ नाही. समजा गडाची डागडुजी केली तर ते चांगलेच आहे. आपल्या ताब्यात आयताच सज्ज झालेला गड आला तर चांगलेच आहे. तो एवढासा शिवाजी त्याला आवरणे काही कठीण गोष्ट नाही असे अमीनमियाला वाटले.

इकडे बारा मावळातील पाटील, देशमुख राजांना सामील झाले. त्यांनी शेतसारा स्वराज्याच्या खजिन्यात भरण्यास सुरूवात केली. ठाणे अंमलदार अमीनकडे कोणीही शेतसारा भरण्यास तयार नव्हते. हा प्रकार पाहून अमीन खूपच संतापला त्यामुळे त्याने एक सांडणीस्वार विजापुरला पाठविला, त्यात त्याने शिवाजीने गड कसा ताब्यात घेतला व त्यात कोण कोण सामील झाले, याची नावासह माहिती पाठविली. त्यात त्याने लोकांनी शेतसारा भरण्याचे देखील बंद केल्याचे सांगितले आणि म्हणून एखाद्या सरदारास शिबंदीसह शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी पाठवावे, असेही सांगतिले.

आदिलशहाला हे सर्व कळाल्यावर तो फार संतापला व त्याने शहाजीराजांना बोलवून त्याविषयी विचारले. तेव्हा शहाजीराजांनी शांतपणे सांगितले, “अहो, शिवाजी असे का व कशासाठी करेल? त्याने किल्ला घेऊन आपल्याच जहागिरीचे रक्षण केले आहे त्यामुळे आपण अजिबात चिंता करू नये.”

शिवाय त्यात भर म्हणून शिवरायांनी देखील आदिलशहाला पत्र पाठवून गोड शब्दात तेच सांगितले त्यामुळे आदिलशहा शांत झाला. परंतु त्याने बारा मावळातील पाटील व देशमुख यांना फर्मान पाठवून शिवरायांना मदत करू नये असे लिहिले होते, त्याचबरेाबर शेतसारा देखील आदिलशाही खजिन्यात भरण्यास सांगितले.

आदिलशाहाचे सरदार दक्षिणेतील लढाईत गुंतलेले असल्यामुळे शिवरायांचे पारिपत्य करण्यास कोणीही सरदार तेथे नव्हता. शिवरायांचे पारिपत्य म्हणजे अतिशय किरकोळ असेही त्याला वाटत होते.

पाटील-देशमुखांप्रमाणेच नरसू प्रभू यांना देखील आदिलशाही फर्मान आले त्यामुळे ते घाबरले. त्यांनी लगेच मुलाला शिवरायांकडे पाठविले. शिवरायांनी त्यांची समजूत घातली. 

आपण सर्वांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे. श्रींच्या इच्छेनेच ‘आपण स्वराज्य स्थापन केले आहे त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नाही. श्रींचा आशीर्वाद असल्यामुळे विजय आपलाच होणार आहे.’

शिवरायांचा हा निरोप त्याने वडीलांना सांगितला. त्यामुळे नरसू प्रभूंचे समाधान झाले. त्यांनी तेव्हापासून प्रतिज्ञा केली की, परक्यांच्या गुलामीत जगण्यापेक्षा राजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात जगू. त्यातच आमच्या जन्माचे सार्थक होईल.’

सर्व मावळ खोरे शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले. शिवराय स्वतः सर्व कामांत लक्ष देऊ लागले. न्याय-निष्ठुरतेने निर्णय व्हायला लागले. तोरण्यावर स्वराज्याचा जसा झेंडा फडकला तसेच इतर ठिकाणी देखील स्वराज्याचे झेंडे फडकले.

Read लहान मुलांच्या मराठी गोष्टी | Marathi Stories For Kids With Moral | छान छान गोष्टी

11. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

shakti pekshya yukti shreshtra

Shakti pekshya yukti shreshtra: "स्वराज्याच्या जवळील जावळीचे खोरे येथील आदिलशहाचा सरदार चंद्रराव मोरे मरण पावला व तो निपुत्रिक असल्याने राज्याला वारस उरला नाही व त्यामुळे आदिलशहा ती जहागीर जप्त करील अशी दहशत निर्माण झाली. असे झाले तर चंद्रराव मोरे यांच्या विधवा पत्नीला दुसऱ्याच्या दयेवर जगावे लागेल म्हणून तिने मोरे घराण्यातील एका मुलाला दत्तक घेण्याचे ठरविले व यासाठी शिवरायांची मदत घेण्याचे ठरविले.

जावळीचे खोरे हे स्वराज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे तेथील जहागीरदार जर आपल्याशी सलोख्याने राहणार असेल तर आपल्यासाठी ती एक चांगली बाजू होईल, असा दुरचा विचार करून फक्त सोळा वर्षाचे शिवराय आपल्याबरोबर घोडदळ, पायदळ घेऊन जावळीत निघाले. मोऱ्यांच्या विधवा पत्नीने एका मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव देखील परंपरेप्रमाणे ‘चंद्रराव’ असे ठेवले गेले. आदिलशहाने ‘चंद्रराव’ हा या घराण्याला दिलेला कायमचा किताब होता. तसे बघितले तर स्वराज्याच्या दृष्टीने ही जहागीर अत्यंत महत्वाची होती तरी देखील शिवरायांनी ती संधी नाकारली. 

शिवराय वयाने लहान असून देखील मोऱ्यांच्या पत्नीने त्यांना नमस्कार केला व नजराणा भेट दिला. चंद्रराव वयाने मोठा होता तरी तो देखील शिवरायांच्या पाया पडला. तो हे जाणून होता की, शिवरायांनी दिलेल्या संरक्षणामुळेच आपण जहागिरीचे धनी झालो आहोत आणि ‘चंद्रराव’ हा किताब आपल्याला मिळाला आहे.

जेव्हा शिवराय गडावर आले तेव्हा त्यांना समजले की, आदिलशहाने स्वराज्याचा वैरी असलेल्या अमीन मिया याची कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आहे व तो लगेच कोंढाण्याकडे येणार आहे. स्वराज्याचा हा कपटी, बेरकी, आक्रमक स्वराज्याच्या सीमेजवळ येऊन राहणार ही गोष्ट तशी गंभीर होती.

यावर विचार करून शिवरायांनी खेडेबारे गावच्या बापूजी मुद्गलांना बोलविले आणि सांगितले की, “बापूजी हा शत्रू येथे येणार आहे व हा शत्रू येथे येणे म्हणजे स्वराज्याला धोका आहे आणि म्हणून कोंढाणा हा आपल्याच हाती पाहिजे.” असे सांगून त्यांनी बापूजींना हे काम शक्तीपेक्षा युक्तीनेच केले पाहिजे व म्हणून त्यांनी त्यांना गुप्तपणे काही गोष्टी सांगितल्या व त्याप्रमाणे ते कामाला लागले.

गडावर सिद्दीअंबर हा गडकरी व काही फौज होती. बापूजी किल्लेदाराचा पाहुणा आहे असे सांगून गडावर गेले व तेथे त्यांनी प्रवेश मिळविेला. गडावरील पाहुण्याकडे बापू गेले. बापू बोलण्यात हुशार असल्यामुळे त्याच्या जिभेवर जणू साखर घोळत होती. त्यामुळे ते समोरच्याला बरोबर आपलेसे करायचे.

आता बापूजींचे किल्लेदार पाहुणे म्हणजे आबाजी होय. आबाजी बापूजींना म्हणाले, “बापूजी, तुम्हाला काय सांगणार! आम्हाला डोळयांत तेल घालून गडावर पहारा द्यावा लागतो. थोडा देखील वेळ आम्हाला मिळत नाही. पोटासाठी परक्याची चाकरी करावीच लागते आहे व आमचा जन्म व्यर्थच चालला आहे.”

बापूजींनी आबाजींचे असे दुःखी बोलणे ऐकले व ते त्यांना म्हणाले, “आबाजी, आपण दुःखी होऊ नका. कारण लोकांवरील अत्याचार थांबावे व त्यांना सुखाने दोन घास खाता यावे यासाठी आपले शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या जिवाचे रान करीत आहेत आणि अशा वेळेस आपण सगळयांनी त्यांना सर्व प्रकारे मदत करणे गरजेचे आहे व ते प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे. तुमच्यासारखी अतिशय विचारी व जाणती माणसे जर अशी दुःख करीत बसली तर काय उपयोग?”

आबाजींना विचारी म्हंटले म्हणून त्यांना खूपच बरे वाटले व ते म्हणाले, “बापूजी, तुमच्या मनात जे आहे तेच आमच्या देखील मनात आहे. परंतु आम्हाला ते या गडावर उघडपणे बोलता येत नाही.”

तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “आबाजी, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला खरंच आपल्या राजांविषयी आदर असेल तर मी प्रत्यक्ष शिवरायांना तुमच्या भेटीसाठी घेऊन येईन.”

ते ऐकून आबाजींना बरे वाटले व ते म्हणाले, “खरेच, असे होऊ शकते का?”

तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “होय, परंतु त्यासाठी मला एखादी गुप्त वाट तुम्ही दाखवा, म्हणजे कोणालाही न कळता हे काम होईल.”

बापूजींचा हेतू बरोबर साध्य झाला. आबाजींनी त्यांना गडावर येण्याची गुप्त वाट दाखविली. तेव्हा ताबोडतोब बापूजी शिवरायांकडे आले व गुप्त रस्ता सापडल्याचे त्यांना सांगितले, तेव्हा त्याच रात्री बापूजी व आपले हत्यारबंद पाचशे मावळे यांना घेऊन शिवराय गडावर आले व गडावरील आदिलशाही फौजेला त्यांनी हुसकावून लावले आणि नंतर राजांनी गडावर आपले भगवे निशाण फडकावले. अशा प्रकारे कोंढाणा हा न लढाई करताच स्वराज्यात दाखल झाला.

शिरवाळच्या किल्ल्यातील अमीन मियाला कोंढाण्याबाबतीत जे घडले ते काहीच माहित नव्हते. तो आपण कोंढाण्याचे सुभेदार आहोत असे समजून अतिशय आनंदाने आपल्याबरोबर थोडीशी फौज घेऊन कोंढाण्याकडे निघाला. पुढे गेल्यावर वाटेत त्याला समजले की, कोंढाणा हा शिवरायांनी घेतला. तेव्हा तो खूप संतापला.

अमीन मिया आता परत शिरवळला निघाला तेव्हा शिवरायांनी त्याची ती वाट देखील अडविली होती. मिया अमीनजवळ अत्यंत थोडीशीच फौज होती व थोडी फौज शिरवळच्या किल्ल्यात होती. शिवरायांनी याचा फायदा घेतला व ते लगेच शिरवळला गेले. तेथे जाऊन शिवरायांनी अमीन मियाच्या फौजेला घालवून दिले व शिरवळच्या किल्ल्यावर देखील भगवा झेंडा फडकू लागला.

शिवरायांनी शिरवळचा किल्ला देखील ताब्यात घेतला त्यामुळे मिया अमीन विजापुरला निघून गेला.

12. शिवरायांची दूरदृष्टी

shivaji maharaj katha

shivaji maharaj katha: "शिरवळचा अमीन मिया हा पराभूत झाल्यामुळे विजापुरच्या दरबारात आला तेव्हा शिरवळचा किल्ला व कोंढाणा देखील गमावला असल्याचे आदिलशहाला समजले. ते ऐकून त्याला धक्काच बसला. शिवाजी आपल्याला डोईजड झाल्याचे त्याच्या लक्षात आले म्हणून याबाबत काहीतरी करायलाच पाहिजे असे ठरवून त्याने आपल्या सरदारांची एक गुप्त बैठक घेतली.

या बैठकीत विचार-विनिमय करून असे ठरले की, शिवरायांवर जरब बसविण्यासाठी त्यांचे वडील शहाजीराजे यांनाच कैदेत टाकावे. तेव्हा शहाजीराजे हे जिंजीचा किल्ला घेण्यासाठी लढत होते त्यामुळे त्यांचा मुक्काम तेव्हा छावणीतच असे. जर शहाजीराजेंना झोपेतच जेरबंद करून कैदखान्यात टाकले, तर शिवाजीराजे त्यांना सोडविण्यासाठी येतील व तेव्हा त्यांचा समजाचार घेता येईल, असा सल्ला आदिलशहाला देणारे मराठा सरदारच होते.

मुधोळचे सरदार बाजी घोरपडे यांचा सल्ला ऐकून आदिलशहाला वाटले की, ‘हा सरदार आपल्याच लोकांवर घाव घालून आपल्याच मायभूमीची राख-रांगोळी करायला निघालाय.’ परंतु हे विचार त्याने बोलून न दाखवता तो मनातून खूप खुष झाला आणि त्याने सर्वांना त्याप्रमाणे कामाला लागण्यास सांगितले.

आदिलशहाचा हुकूम होताच सरदार मुस्तफाखानाने आपल्याबरोबर बाजी घोरपडे, बाळाजी हैबतराव, अंबरखान, बहलोलखान, मंबाजी भोसले असे सरदार आणि मोठी फौज घेऊन जिंजीकडे प्रस्थान केले.

शहाजीराजांनी या सर्वांना बघितले तेव्हा त्यांच्या मनात शंका आली की, ‘यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे.’ मुस्ताफाखानाने शहाजीराजांच्या गळयात पडून सांगितले की, “राजे, तुम्ही जिंजी जिंकण्यासाठी किती प्रयत्न करीत आहात व त्यामुळेच आदिलशहा तुमच्यावर खूप खुष आहे. आपण हा किल्ला लवकरात लवकर जिंकून कर्नाटकातील इतर मुलूख जिंकण्यास मोकळे व्हावे यासाठी आम्हाला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे.”

शहाजीराजांनी मुस्तफाखानच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण ते तरी देखील सावध होते. मुस्तफाखानचे त्यांच्या छावणीवर बारीक लक्ष होते. शहाजीराजे पहाटेच्या गाढ झोपेत असताना मुस्तफाखानचे शेकडो सैनिक हातात तलवारी व पेटत्या मशाली घेऊन शहाजीराजांच्या छावणीत आले तेव्हा शहाजीराजे ताडकन उठले व त्यांच्या लक्षात आले की, आपल्याबरोबर धोका झाला आहे परंतु तसे असताना देखील शहाजीराजांनी शत्रूशी तलवारीने लढून प्रतिकार केला परंतु शेकडो सैनिकांसमोर एकटयाने लढणे अशक्यच होते. त्यामुळे शहाजीराजे जखमी झाले व भोवळ येऊन खाली कोसळले. त्याबरोबर लगेचच मुस्तफाखानच्या सैन्याने त्यांना उचलून खानाच्या छावणील आणले व त्यांच्या हाता-पायात बेडया घालून कैद केले.

शहाजीराजे अशा रितीने कैद झाले. मुस्तफाखान व इतर सरदारांना फार आनंद झाला. आता शिवाजीराजे आपल्या ताब्यात येणारच असे त्यांना वाटले. शहाजीराजे भानावर आल्यावर त्यांना सर्व काही समजले.

इकडे शिरवळचा किल्ला व कोंढाणा स्वराज्यात दाखल झाले म्हणून शिवराय व त्यांचे मर्द मावळे राजगडावर आनंद साजरा करीत होते, परंतु तितक्यात त्यांना शहाजीराजांना कैद केल्याचे समजले. जिजाऊ व शिवराय अत्यंत काळजीत पडले.

तेवढयात दुसरी बातमी आली की, बंगळुरला असणारे शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे व इतर कुटुंबियांना जेरबंद करण्यासाठी मुस्तफाखानाने बंगळुरला मोठी फौज पाठविली आहे. त्याचबरोबर तिसरे संकट देखील त्यांच्या समोर उभे राहिले ते म्हणजे शिवरायांना धडा शिकविण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला मोठी फौज घेऊन पाठविले आहे.

शिवरायांच्या पुढे हे तिहेरी संकट आले त्यामुळे ते अतिशय काळजीत पडले म्हणून त्यांनी माँसाहेब व इतरांशी चर्चा केली व स्वराज्यावर आलेल्या संकटांची सर्वांना कल्पना दिली. जर शत्रूच्या कारवाया थांबल्या नाहीत, तर सर्वजण शत्रूच्या कैदेत पडतील. प्रसंग खरोखरच कठीण आहे. सर्वांचीच जर सुटका करायची असेल तर स्वराज्याला मुकावे लागणार आणि स्वराज्य जतन करायचे म्हंटले तर शहाजीराजे व इतर कुटुंबीय शत्रूच्या कैदेत खितपत पडणार. काय करावे, परंतु यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. श्रींची इच्छा होती, हे राज्य व्हावे म्हणून. मग ते टिकावे यासाठी देखील तेच काहीतरी मार्ग सुचवतील. आता धीर सोडून चालणार नाही.

शिवराय मुत्सद्दी होते त्यामुळे त्यांनी मार्ग शोधला. दिल्लीच्या बादशहाला कसले तरी आमिष दाखवून त्याच्याशी संधान जुळवायचे व त्याचा दबाव आदिलशहावर आणून थोरले महाराज व थोरले बंधू संभाजीराजांना वाचवावयाचे. शिवरायांचे वय तेव्हा फक्त अठरा वर्षाचे होते तरीदेखील त्यांची दुरदृष्टी पाहून माँसाहेबांना फार कौतुक वाटले व शिवरायांविषयीचा आदर अधिकच वाढला.

मोगलांसारख्या सर्व सत्ताधीशांनी आपली शक्ती पाहिली की ते नक्कीच आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करतील व त्यासाठी आपण प्रथम पुरंदरसारखा गड ताब्यात घेऊ. फत्तेखान आपल्यावर चालून येण्याआधीच पुरंदर घेतला पाहिजे; म्हणजे गडाच्या आश्रयाने आपण त्या फत्तेखानाचा सहज पराभव करू शकू, असे शिवरायांचे विचार होते.

तेथील सर्वजण शिवरायांच्या या डावपेचाने आश्चर्यचकित झाले व त्यामुळे त्यांना शिवरायांची दूरदृष्टी देखील कळाली.

13. पुरंदर जिंकला

Purbandar jinkla story

शिवरायांनी मनाशी पक्का निर्धार केला होता की, श्रींच्या इच्छेने स्थापन केलेले स्वराज्य हे टिकवायचेच. फत्तेखानाचा पराभव करायचा त्यासाठी राजांनी आपल्या डावपेचांना सुरूवात केली. फौजांना त्यांनी सज्ज राहण्यास सांगितले. त्यांनी मोगल बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठविला.

राजांच्या फौजेतील सर्व मावळयांनी गडावरील देवीचे दर्शन घेतले. माँसाहेबांचा आशीर्वाद घेतला व फौज निघाली. वाऱ्यावर भगवा फडकत होता. राजांच्या बरोबर जिवाला जीव देणारे अनेक शूर असे मावळे होते. राजांनी हात उंचावून गर्जना केली, ‘जय भवानी’ त्याबरोबर सर्वांनीच ‘जय भवानी’ अशी गर्जना केली.

राजांचे मावळे पुरंदरच्या दिशेने निघाले. पुरंदरचे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे होते. आता त्यांचे वय झाले होते परंतु तरीदेखील त्यांनी तलवार चालविणे सोडले नव्हते. त्यांचे पूर्ण आयुष्य सुलतानाची, बादशहाची चाकरी करण्यात गेली होती. असे हे वयोवृद्ध सरनाईक शहाजी राजांचे जिवलग मित्र होते. आपल्या मित्राचा हुशार व बहादूर मुलगा शिवबा यांचे त्यांना फारच कौतुक होते. एवढया कमी वयात स्वराज्य स्थापणारा हा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाने फार मोठा होणार असे त्यांना मनापासून वाटत होते.

शिवरायांची फौज पुरंदरकडे चालली होती. तेव्हा राजांनी स्वतः शेतकऱ्याचा वेष केला आणि ते नीळकंठरावांना भेटले. राजांनी त्यांना काय घडले, परिस्थिती कशी आहे, हे सर्व सांगितले. यावेळेस आम्हाला मदत करा असे सांगितले. आपली फौज पुरंदरावर ठेवून दिली तर आम्ही त्या फत्तेखानाला पळवून लावू असा विश्वास दिला.

शिवरायांचे बोलणे नीळकंठरावांना पटले. बादशहाची सेवा करण्यात पूर्ण आयुष्य गेले मग आयुष्याच्या शेवटी जर स्वराज्याची काही सेवा करता आली तर निदान आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असा विचार करून नीलकंठरावांनी गड शिवरायांकडे सोपविला व ते म्हणाले, “तुम्ही लवकर जा आणि आपली फौज गडावर घेऊन या. उशीर करू नका. मी गडाचे दरवाजे उघडून ठेवतो. हे करताना माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तरी मला त्याची पर्वा नाही.”

शिवरायांनी आपली फौज लगेचच पुरंदरावर नेली. तेथे जाताच राजांनी गडाची पाहणी करून लढाईच्या दृष्टीने गड सज्ज करण्यास सुरूवात केली. बुरूजावर तोफा चढू लागल्या, दारूगोळयाचे पेटारे माचीवर नेण्यात आले. गस्त सुरू झाली. शिवराय स्वतः फिरून सर्व व्यवस्था पाहात होते.

शिवरायांच्या एका हेराने बातमी आणली की, सरदार फत्तेखान मोठी फौज घेऊन विजापुराहून निघून बेलसरपर्यंत आला आहे आणि शिवाय त्याने सरदार बाळाजी हैबतरावाला पुरेशी फौज, दाणागोटा, भरपूर हत्यारे व मोठा खजिना बरोबर देऊन शिरवळकडे सुभानमंगळ किल्ला व ठाणे काबीज करण्यासाठी पाठवले आहे. हि माहिती शिवरायांना कळताच त्यांनी एका मावळयाला बोलवून सांगितले, “तू ताबोडतोब शिरवळच्या आपल्या ठाणेदाराकडे आणि सुभानमंगळ किल्ल्याच्या किल्लेदाराकडे जा आणि आमचा निरोप सांग. सरदार बाळाजी हैबतराव ठाणे आणि किल्ला घेण्यास निघाला आहे. जर तो आलाच, तर ठाणे आणि गड खुशाल त्याच्या ताब्यात देऊन टाका व तेथून निघा आणि जवळच्याच रानात आमचा पुढील निरोप येईपर्यंत लपून राहा.”

मावळा लगेच तो निरोप घेऊन निघून गेला. राजांनी सरळ सरळ ठाणे आणि किल्ला शत्रूच्या हवाली कसा करण्यास सांगितला, असा प्रश्न नीळकंठरावांनी शिवरायांना विचारला. तेव्हा राजे त्यांना म्हणाले, “हे बघा नीळकंठजीकाका, जेव्हा फत्तेखानाला कळेल की मी पुरंदर ताब्यात घेतला आहे, तेव्हा तो इकडेच चालून येईल व त्याच्याशी लढाई होईल ती येथेच. ही लढाई किती दिवस चालेल ते काही आत्ता सांगता येणार नाही. तेव्हा आपल्या या गडावर पुरेसा दाणागोटा, हत्यारे यांचा साठा असायला हवा. तसेच भरपूर धन हवे. तो आदिलशाही सरदार हैबतराव शस्त्रास्त्रे व खजिना आयताच घेऊन आपल्याकडे येत आहे तर त्याला आपण कशासाठी अडवायचे? तो आल्यावर जर त्याला लढाई न करताच शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला मिळाला तर तो खुश होईल. मराठे आपल्याला घाबरून पळाले असे त्याला वाटून तो बेसावध राहिल; खजिना, दाणागोटा, हत्यारे किल्ल्यात भरून ठेवील. तो असा बेसावध असतानाच आपण त्याच्यावर हल्ला करू. आमची खात्री आहे की आपलाच विजय होईल आणि मग काय त्याचा खजिना, हत्यारे सर्व काही आयतेच आपल्या ताब्यात येईल. ते सर्व आणून हया किल्ल्यात ठेवून देऊ. शत्रूच्याच हत्याराने त्याचाच बळी घेऊन मिळविलेला विजय यासारखे दुसरे समाधान नाही.”

शिवरायांची ही दूरदृष्टी बघून नीळकंठराव खूपच चकित झाले. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी शिवराय प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते. तेवढयात त्यांना समजले की, बाळाजी हैबतरावाने सुभानमंगळ आणि शिरवळचे ठाणे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यात सर्व सरंजाम भरला आहे. ते ऐकून शिवरायांनी त्वरीत आपल्या शूर सरदारांना बोलवून सांगितले की, “येथून पाचशे घोडेस्वार बरोबर घेऊन शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला येथून पळ काढून आपल्या रानात लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घ्या व शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ल्यात शिरून शत्रूला पराजित करून चांगला धडा शिकवा. तसेच बाळाजी हैबतरावाची मान कापा. ठाणे आणि किल्ला आपल्या ताब्यात आल्यावर तेथील धन आणि हत्यारे घ्या व थोडी फौज तेथे ठेवून सर्व ऐवज घेऊन इकडे या.”

शिवरायांची आज्ञा ऐकताच स्वराज्यासाठी प्राण देखील देण्यास तयार असणारे मावळे सैनिक आपल्या लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घेऊन ‘हर, हर महादेव’ अशी गर्जना करीत निघाले. त्यांचा आवाज ऐकून हैबतरावाला वाटले की, हे शेंदाड शिपाई आलेले दिसतात. त्या रानटी पोरांना लढाईत काय कळतंय? म्हणून तो सैनिकांना म्हणाला, “ही पोर आपल्याला पाहून काल पळाली. आता त्यांना जागेवरच गार करा. कोणालाही पळण्याची संधी देऊ नका.”

शिवरायांची फौज किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आली व इशारा मिळताच फौजेने मोठे दगड दरवाज्यावर मारायला सुरूवात केली. त्यामुळे तो भक्कम दरवाजा मोडला व त्याबरोबर राजांची सर्व फौज किल्ल्यात घुसली आणि त्यांनी आदिलशाही फौजेला कापून काढण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांचे भरपूर सैन्य कापले गेले. हे बघताच उरलेल्या फौजेचा धीर खचला व ते माघार घेऊ लागले.

शिवरायांचे विश्वासू कावजी मल्हार हे बाळाजी हैबतरावांसमोर आले व त्यांना म्हणाले, “तूच ना तो गद्दार, ज्याने कपटाने जिंजीला शहाजीराजांच्या छावणीत घुसून त्यांना झोपेतच हाता-पायात बेडया घातल्यास. आता बघ मी तुला वर पाठवितो.”

असे बोलून कावजी मल्हार यांनी आपल्या हातातील अतिशय टोकदार फाळ बाळाजी हैबतरावांच्या दिशेने फेकला व हैबतराव जागीच ठार झाले. हे बघून आदिशहाचे अशफरशाह व फाजलशाह हे सरदार देखील पळून गेले व इतर फौजफाटाही पळून गेला.

किल्ल्यामध्ये गंडगंज संपत्ती, हत्यारे, दारूगोळा मावळयांच्या हाती पडला. त्यानंतर थोडी शिंबदी गडाच्या रक्षणासाठी ठेवून सर्व मावळे सैनिक पुरंदर गडाकडे परत आले.

सर्व विजयी मराठे वीर ‘फत्ते! फत्ते! अशी गर्जना करीतच पुरंदर गडावर पोहोचले. गडावर आल्यावर शिवरायांनी त्यांना पाठ थोपटून शाबासकी दिली तेव्हा ती थाप पाठीवर पडताच सर्व मावळयांना खूप समाधान वाटले.

14. शिवराय व मावळयांचा विजय

shivaji maharaj fight story in marathi

शहाजीराजे आदिलशहाच्या हुकुमानुसार कैदेत होते त्यामुळे आदिलशहा खूपच आनंदी होता. बंगळूरहून फर्रादखान शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून येथे आणेल व फत्तेखान तिकडे शिवरायांचा पराभव करेल असा विचार करून आदिलशहा मनातल्या मनातच खूप खुश होत होता.

फत्तेखानाला देखील असेच वाटत होते की, आपल्या सैन्यामुळे शिवाजी भयभीत होईल व बाळाजी हैबतराव शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ गड त्यांच्याकडून हिसकावून घेईल तेव्हा ते मावळे पळून जातील. मग एकटे शिवाजी काय करणार? पुरंदर आपल्याला आयताच मिळेल.

इकडे शिवराय लढाईच्या दृष्टीने पुरंदरचा बंदोबस्त करण्यात गुंतले होते. शिवरायांनी मावळयांना सांगितले, “जर फत्तेखान येथे येण्याआधीच आपण त्याच्यावर हल्ला केला तर.?”

राजांचा हा विचार सर्वांना पटला आणि फत्तेखानावरील हल्ल्याची योजना तयार झाली. सर्व मावळयांनी ठरवविल्याप्रमाणे मध्यरात्रीच फत्तेखानाच्या छावणीवर धाड टाकली. फत्तेखानाच्या सैनिकांना कोणी हल्ला केला हे कळण्याच्या आतच मावळयांनी शेकडो सैनिकांच्या माना कापल्या. सर्व ठिकाणी हलकल्लोळ झाला. समोरासमोर लढणे आता कठीण आहे हे लक्षात येताच सर्व मावळे पुरंदरकडे निघून गेले.

फत्तेखानाचे सैनिक अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खूपच घाबरले. कधी अचानक येऊन मावळे आपल्या माना कापतील याचा त्यांना भरोसा राहिला नाही. फत्तेखान देखील मनातून खूपच घाबरला परंतु वरवर तो उसने अवसान आणत शिवरायांवर चालून जाण्याच्या कल्पना करू लागला.

फत्तेखान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असतानाच शिरवळवरून कसा-बसा आपला जीव वाचवून पळालेले फाजलशाह आणि अशरफशाह त्याच्यासमोर येऊन उभे राहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की काल रात्री आपली जी अवस्था झाली तीच यांची देखील झाली असणार! तरी देखील त्याने त्यांना विचारले, ‘काय झाले? तुमची तोंड अशी काळी का पडली आहेत!”

तेव्हा त्याला समजले की, बाळाजी हैबतराव मारला गेला, सुभानमंगळ किल्ला आणि ठाणे शिवरायांनी परत जिंकून घेतले. हे ऐकून तर तो पूर्णपणे खचून गेला. परंतु कसेबसे उसने अवसान आणत तो म्हणाला, “त्या एवढयाशा पारोंनी तुम्हाला धूळ घातली?”

फत्तेखान आता खूपच संतापला व त्या संतापातच त्याने आपल्या फौजेला पुरंदराकडे कूच करण्यासाठी सज्ज होण्यास सांगितले. ते सर्वजण पुरंदरकडे निघाले तेव्हा पुरंदरावर अतिशय उत्साहाचे वातावरण होते.

फत्तेखानाची फौज गडाकडे येताना दिसताच इशारा दिला गेला व सगळीकडे धावपळ, लगबग, गडबड सुरू झाली आणि प्रत्येक मावळा आपली हत्यारे घेऊन नेमून दिलेल्या जागी सज्ज झाला. तोफांची तोंड शत्रूकडे वळली. खानाला सर्वत्र शांतता दिसली म्हणून त्याने आपल्या फौजेला गडावर हमला करण्यास सांगितले.

फत्तेखानाची एवढी मोठी फौज घोडयावर बसून गड कसा काय चढणार? आणि पायवाट तर चिंचोळी होती. त्यासाठी ते सर्वजण घोडयावरून उतरून गड चढू लागले. फत्तेखान देखील स्वतः गड चढू लागला. या फौजेला अशी चढणीची सवय नसल्यामुळे थोडे वर जाताच त्यांची दमछाक झाली.

गडावर मात्र सर्व तयारी होती म्हणून ती फौज माराच्या टप्प्यात येताच राजांनी इशारा केला व प्रचंड शिळा, दगड खानाच्या फौजेवर आदळू लागले. त्यामुळे अनेक सैनिकांचा फडशा पडला. मेलेले सैनिक गडगडत खाली जाऊ लागले. खानाची सर्व फौज लाहयांसारखी होरपळून निघाली. सर्व डोंगर रक्ताने लाल झाला. आता खानाच्या फौजेचे धैर्य खचायला लागले.

कावजी मल्हारने मिनादखानला गाठले तर गोदाजी जगताप मुसेखानावर चालून गेला. गोदाजीची तलवार मुसेखानाच्या काळजात आरपार घुसली. खानाच्या फौजेने शस्त्रे तेथेच टाकून ते जीव वाचविण्यासाठी तेथून पळत सुटले. मावळे मात्र त्यांचा पाठलाग करीत होते. बाजी पासलकर देखील शत्रूच्या मागे धावत होते. परंतु ते एकटे आहेत असे बघून शत्रूने त्यांना एकटे गाठून ठार केले. शिवरायांना आपला जिवलग सखा गेल्याचे बघून खूपच गहिवरून आले.

फत्तेखानाची उरलेली फौज जीव वाचवण्यासाठी पळून गेली. शिवरायांच्या मावळयांनी मात्र पराक्रम करून बलाढय अशा शत्रूचा पराभव केला होता. नीलकंठकाकांचे शिवरायांनी आभार मानले व त्यांचा भेटी देऊन सत्कार केला. गडावर संरक्षणासाठी अधिकारी नेमले आणि पुरेशी अशी शिबंदी ठेवून शिवराय आपल्या मावळयांसह राजगडावर परत आले.

15. शहाजीराजांची सुटका

shivaji maharaj full story in marathi

Shivaji maharaj full story in marathi: शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैदेत टाकले होते. फर्रादखान व त्याचे सहकारी सरदार बंगळूरला शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून आणण्यासाठी गेले होते म्हणून आदिलशहा त्यांची वाटच बघत होता परंतु इतक्यात फर्रादखान व इतर सरदार माना खाली घालून आदिलशहापुढे उभे राहिले.

तेव्हा आदिलशहाला समजले की, बंगळूरला संभाजीराजांनी त्यांना बेदम मारून पिटाळून लावले होते. ते ऐकून आदिलशहा खूप संतापला. तो आता शिवरायांवर चालून गेलेल्या फत्तेखानाची वाट बघत होता. तेवढयात फत्तेखान अतिशय पडलेला चेहरा घेऊन आपल्या इतर सरदारांसह आदिलशहासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी देखील शिवरायांनी आपल्याला कसे बेदम मारले ते सांगितले. त्याचबरोबर मुसेखान मेला, या सर्व बातम्या ऐकून आदिलशहा खूपच संतापला. आता त्याला कळाले होते की, त्याचा पराभव झाला होता.

आदिलशहाने तरीदेखील असा विचार केला की, काही झाले तरी अजून त्या शिवरायांचे पिताश्री तर आपल्या ताब्यात आहेत ना! असा विचार करून त्याने शिवरायांना पत्र पाठवीत त्यात म्हंटले, “तुम्ही तुमचे गड-किल्ले आणि जहागिरी आमच्या ताब्यात देऊन आमच्या दरबारात हजर व्हा; नाहीतर उद्या तुमच्या वडिलांचे आम्ही काही बरे-वाईट करू.” हे पत्र दिल्यामुळे आदिलशहाला वाटले की, आता शिवराय आपल्याकडे लगेच येतील.

परंतु तसे मात्र झाले नाही. कारण शिवराय विचार करीत होते की, आपले वडील शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत आहेत तर पुरंदरच्या लढाईत आपले खरे सहकारी बाजी पासलकर हे धारातीर्थी पडले. फर्रादखानाने बंगळुरास वेढा दिलेला होता. या विचाराने शिवरायांना विजय मिळाल्याचा आनंद घेता आला नाही. इतक्यात त्यांना कळाले की, त्यांचे मोठे भाऊ संभाजीराजांनी बंगळुरास फर्रादखानाला भरपूर मारून हाकलून लावले होते. या बातमीने शिवरायांची थोडीशी काळजी दूर झाली होती.

आता शिवरायांनी मुद्दाम दिल्लीच्या बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठवला होता. त्यांनी या गोष्टीचा फायदा करून घेण्याचे ठरविले. आपण बादशहाला पत्र पाठविल्याची माहिती आदिलशहाला कळेल अशी त्यांनी व्यवस्था केली आणि बरोबर तसेच झाले. त्या बातमीने आदिलशहा घाबरला, कारण त्याला वाटले की, आता शिवराय दिल्लीच्या बादशहाला सामील होऊन आपल्यावर मोगलांची टोळधाड आणणारच. जर ते दोघे एकत्र आले तर आपली आदिलशाही जागेवर राहील का? हा विचार करून तो खूपच घाबरला. आपला डाव आपल्यावरच उलटतो आहे की काय? असे त्याला वाटले.

फत्तेखान शिवरायांकडून मार खाऊन परत आला. तसेच फर्रादखान बंगळूरहून हात हलवत परतला. मुस्तफाखान जिंजीजवळ मेला आणि आता या शिवरायांनी बादशहाशी जवळीक करून आमचेच दात आमच्याच घशात घातले तर, असा विचार करून आदिलशहा खूपच गोंधळला. आता आपल्याकडे शहाजीराजांना सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्याच्या लक्षात आले.

आदिलशहाने असे दाखविले की, आपण शहाजीराजांना स्वखुशीने सोडून देत आहोत. त्यामुळे शहाजीराजांची तेथून सुटका झाली व त्यांना आदिलशहापुढे हजर करण्यात आले. तेव्हा आदिलशहा शहाजीराजांना म्हणाला, “राजे, जे काही घडले ते फक्त गैरसमजुतीमुळे घडले. आता आमच्या मनात तुमच्या विषयी काहीच नाही. आम्ही आपल्या मैत्रीची कदर करतो आहोत. आमचे व तुमचे संबंध आता पूर्वीसारखेच राहतील. तुम्ही फक्त आमच्यासाठी एक गोष्ट करा की, जसे आम्ही तुम्हाला सोडले तसेच तुम्ही आमच्यावरील तुमचे प्रेम दाखवण्यासाठी शिवरायांना सांगून त्यांच्या ताब्यातील कोंढाणा गड आणि संभाजीच्या ताब्यातील बंगळूर आमच्या ताब्यात द्या आणि तुम्ही पूर्वीसारखेच आमच्या सेवेत राहा.”

आदिलशहाची लहर कधी फिरेल याचा विश्वास नाही, असा विचार करून शहाजीराजांनी त्याचे म्हणणे मान्य केले तेव्हा आदिलशहाला खूपच आनंद झाला. त्याने हत्ती, घोडे व मानाचा पोशाख देऊन शहाजीराजांचा मोठा मान-सन्मान केला.

राजगडावर हे वृत्त समजताच माँसाहेबांना आणि शिवरायांना खूप आनंद झाला. आपले वडील सुटले, स्वराज्य बचावले, पराक्रमाचे सार्थक झाले. परंतु एक शल्य मात्र शिवरायांना होते की, कोंढण्यासारखा गड आदिलशहाला परत करावा लागणार होता कारण शहाजीराजांचे तसे पत्र आले होते. शिवरायांनी विचार केला की, ठीक आहे, आम्ही कोंढाणा देऊ; परंतु थोडयाच दिवसांत तो परत जिंकून घेऊ, असा विचार करून शिवरायांनी कोंढाणा आदिलशहाला परत केला परंतु तो परत जिंकण्याचा निर्णय घेऊनच.

या होत्या शिवाजी महाराजांच्या कथा मराठी मध्ये (Shivaji Maharaj Stories In Marathi) तुम्हाला या गोष्टी कसे वाटले आम्हाला कडवा आणि आपल्या मित्रां बरोबर या आर्टिकल ला share करा.

जर तुम्हाला या नंतर च्या गोष्टी वाचायच्या असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कडवा.

4 Comments

  1. पुढच्या गोष्टी वाचायच्या आहेत

    ReplyDelete
  2. भरपूर चांगलं पद्धतीनं इतिहास लिहला आहे. शहाजी राजे चा सुटका झाल्यानंतरची इतिहास कधी पोष्ट करणारं??

    ReplyDelete
  3. Very Helpful for me.
    Proud to be a Maratha..

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post